NCP News : खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष म्हणून नेमतानाच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. ‘मी पक्षाचा उपाध्यक्ष आहे, सध्या मी पक्षात दोन नंबर आहे. मी तीन नंबर कसा होतो, त्याऐवजी मी राजीनामाच देतो, असे खासदार पटेल यांनी म्हटले हेाते, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी आज केला. (MP Praful Patel will resign at the same time... : Chhagan Bhujbal)
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांची शनिवारी येवल्यात (जि. नाशिक) जाहीर सभा झाली. त्या सभेत पवार यांनी आपण वीस वर्षांपूर्वी भुजबळांना येवल्यातून तिकिट देऊन चूक केली, असे विधान केले हेाते. त्याला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्यात त्यांनी पटेल यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले.
भुजबळ म्हणाले की, दिल्लीत अनेक वर्षांपासून तुमच्यासोबत असलेले खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) तुम्हाला का सोडून जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व इतर नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी आपला खास माणूस म्हणून प्रफुल्ल पटेल यांनाच ते पाठवत होते. तेसुद्धा तुम्हाला का सोडून गेले, याचा विचार पवारसाहेबांनी करायला पाहिजे.
पवारसाहेबांना वाटतंय हे सर्व छगन भुजबळ यांनी घडवून आणलं आहे. पण ही चुकीची कल्पना आहे. हे पवारांनासुद्धा माहिती आहे. भाजपसोबत जाण्याबाबत सर्व आमदारांनी सह्या केल्या होत्या. त्यात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारही होते. त्याबाबत सर्वांनी मला साहेबांकडे त्यासंदर्भात बोलणी करण्यासाठी पाठविले होते. मी त्यांच्याशी बोललो एवढाच माझा त्याच्याशी संबंध आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं त्यांच्या घरामध्ये याबाबत ठरलं. पंधरा दिवसांचा वेळ घेतल्यानंतर पवारांनी सांगितलं की मी राजीनामा देणार, त्यानंतर तुम्ही काय करायचे ते करा. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी ‘आता मी राजीनामा देतो, मी आता संस्था बघतो,’ असे सांगितलं होतं. त्यावेळी आम्ही सर्वांनी पवारांना राजीनामा मागे घेण्यासाठी आग्रह केला.
दुसरी दिवशी मी पुन्हा बोललो की भांडण असेल तर मिटवा. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत राष्ट्रीय पक्ष म्हणून काम बघावं आणि महाराष्ट्रात अजितदादांनी पहावं. सर्वकाही असेल तर मिटवून टाकावं. पण, तीन दिवसांनंतर पवारसाहेबांनी माघार घेतली, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांनंतर पवारांनी पुन्हा निरोप पाठविला की सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करायचं आहे. तटकरेंना सांगितलं की पक्षातील सर्व नेत्यांना दहा तारखेला दिल्लीत बोलवा. मी स्वतः प्रफुल्ल पटेल यांना सांगायला गेलो, तर ते म्हणाले की, मी तर पक्षाचा उपाध्यक्ष आहे, दोन नंबर मी आहे. आता मी तीन नंबर कसा होतो, मी तर राजीनामा देतो. त्यावर मी प्रफुल्ल पटेल यांची समजूत काढली. ‘असं करू नका. दोघेही कार्याध्यक्ष व्हावा. पहिलं नाव तुमचं घेतील आणि दुसरं नाव सुप्रिया सुळे यांचे घेतील,’ असे सांगून ते सगळं आम्ही मिटवलं, असा दावाही भुजबळ यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.