Mumbai Police launched an investigation after a ₹6.41 crore salary scam involving fake police employees and fraudulent government salary payments came to light. Sarkarnama
मुंबई

Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा पगार घोटाळा : गृहखात्याला चुना, तब्बल 6 वर्षांनंतर फुटलं बिंग

Mumbai Police ₹6.41 Crore Fraud : मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागाने केलेल्या अंतर्गत चौकशीत हा घोटाळा उघडकीस आला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डेटा जुन्या 'सेवार्थ' प्रणालीतून नव्या प्रणालीत स्थलांतरित करताना काही संशयास्पद नोंदी आढळल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात वेतन वितरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.

Jagdish Patil

Mumbai Police Salary Scam : मुंबई पोलीस दलात तब्बल 6 कोटी 41 लाख रुपयांच्या वेतन घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्तींना बनावट पोलीस कर्मचारी दाखवून त्यांच्या नावावर शासनाकडून नियमित वेतन काढल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागाने केलेल्या अंतर्गत चौकशीत हा घोटाळा उघडकीस आला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डेटा जुन्या 'सेवार्थ' प्रणालीतून नव्या प्रणालीत स्थलांतरित करताना काही संशयास्पद नोंदी आढळल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात वेतन वितरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.

तपासानुसार, उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयातील वेतन व प्रशासकीय कामकाजाशी संबंधित काही मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी पोलीस दलात कार्यरत नसलेल्या 8 ते 10 व्यक्तींना बनावट पोलीस कर्मचारी म्हणून नोंदवले. त्यांच्या नावाने बँक खाती उघडून शासनाकडून नियमित वेतन काढण्यात आले. हा प्रकार 2019 ते 2020 या कालावधीत घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, यात शासनाची 6 कोटी 41 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रादेशिक विभागातील एका पोलीस निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून समतानगर पोलीस ठाण्यात फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, प्रमुख लिपिक अजय राठोड आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांना आरोपी करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या नावांवर वेतन काढण्यात आले. या सर्व व्यक्तींची ओळख, त्यांची भूमिका आणि संबंधित आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. या प्रकरणावर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रात अशा प्रकारचा वेतन घोटाळा झाल्याचे ऐकून मोठे आश्चर्य वाटते.

पोलीस नसलेल्या व्यक्तींना सरकारी वेतन दिले जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. गृह विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी." सध्या समतानगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, घोटाळ्यात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी होते का, तसेच अपहार झालेल्या निधीचा नेमका प्रवाह काय होता, याचा शोध घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT