Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूरमधून पाडणार, असे विधान केले आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या विरोधात अजितदादा कुणाला उमेदवारी देणार, याबाबत चर्चा सुरू होती. यातच अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव पुढे येऊ लागले. कोल्हेंविरोधात अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून उमेदवारीबाबत विचारले असता पाटेकरांनी सूचक विधान केले.
सह्याद्री अथितीगृहावर अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar), मकरंद अनासपुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी भेटीचे कारण विचारले असता त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून यंदा राज्यभरात गाळ काढण्याचे काम करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारशी एमओयू करण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, शिरूरमधून (Shirur) खासदार कोल्हेंविरोधात नाना पाटेकरांच्या नावाची चर्चा होती. त्या चर्चेवर छेडले असता नाना पाटेकरांनी थेट नकार दिला. ते म्हणाले, राजकारण हा माझा प्रांत नाही. तसेच दररोज मी कुठून तरी निवडणूक लढवणार असल्याचे पुढे येत आहे. माझा मतदारसंघ फायनल झाला की मला कळवा, अशी मिश्किल टिप्पणीही पाटेकरांनी केली. (Latest Political Nesws)
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांसाठी जे काम करतोय त्यातून समाधान मिळतेय. तिकडे गेल्यावर हे काम करता येणार नाही आणि समाधानही मिळणार नाही. मी स्पष्ट बोलणारा आहे. मनात आलेले आपण पटकन बोलून टाकतो. त्यामुळे राजकारणात माझा स्वभाव कुणाला पटेल याची खात्री नाही. त्यामुळे ते मला तिकडे कितपत टिकू देतील, अशी शंकाही पाटेकरांनी व्यक्त केली.
सध्या महायुतीत जागावाटपाचा तिढा सोडवण्यावर केंद्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार गटाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात शिरूर मतदारसंघाचाही समावेश आहे. आता नाना पाटेकरांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) पाटलांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे पवार खासदार अमोल कोल्हेंविरोधात कुणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.