कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने शिवसेना शिंदे गट खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांची भेट घेतल्यानं आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी हा फोटो ट्वीट करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यासह श्रीकांत शिंदेंना लक्ष्य केलं होतं. याला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
रविवारी ( 4 फेब्रुवारी ) श्रीकांत शिंदेंचा 'वर्षा' निवासस्थानी वाढदिवस पार पडला. यानिमित्त युवा सेनेचे अनिकेत जावळकरांनी कुख्यात गुंड हेमंत दाभेरकरसह श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा दिल्या. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या फोटोवरून विरोधकांकडून श्रीकांत शिंदेंवर टीका करण्यात येत आहे.
"गुंडांचे इतके बळ का वाढले?"
हा फोटो 'एक्स' अकाउंटवर ट्वीट करत संजय राऊत म्हणाले, "मा. गृहमंत्री देवेंन्द्रजी जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!."
"संजय राऊतांना गुंडांची बारकाईने माहिती"
यानंतर नरेश मस्केंनी अनिकेत जावळकरांना युवसेनातून हकालपट्टी केलेलं पत्र 'एक्स' अकाउंटवर ट्वीट केलं आहे. त्यावर लिहिलं, "अरे वा! संजय राऊत, तुम्हाला गुंड लोकांची बरीच बारकाईने माहिती आहे असं दिसतंय...काल हजारो लोकांनी येऊन श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा दिल्या. त्यात हा गुंड (ज्याला आम्ही ओळखतही नव्हतो) तुम्ही 'वर्तुळात' दाखवलेला आणि त्याला घेऊन येणारा, त्याच्याजवळच उभा असलेला कार्यकर्ताही होता."
"...अन् चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन येणाऱ्यालाच भेटायचं ठरवलंय"
"तुम्ही खूप बारकाईने सगळीकडे लक्ष ठेऊन आहात याचे समाधान वाटले. पण, जो या गुंडाला घेऊन आला त्या अनिकेत जावळकर याचीही, हा गुंड आहे हे समजल्यावर, आम्ही कालच हकालपट्टी केली आहे. आणि यापुढे चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन येणाऱ्यालाच भेटावं, असंही ठरवलं आहे आम्ही!," असं नरेश मस्केंनी म्हटलं.
"उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांपासून दूर राहण्याची गरज"
"बाकी, असेच लक्षात आणून देत चला, कारण आमच्यापेक्षा अशा लोकांना तुम्ही जास्त आणि जवळून ओळखता. पण, आरशातही बघत चला, आपण कोण आहात आणि कोणत्या गुन्ह्यात आपल्याला अटक झाली होती आणि जामिनावरच आपण बाहेर आहोत हेही लक्षात असू द्या. मला वाटतं उद्धव ठाकरेंनी तुमच्यापासून दूर राहण्याची गरज आहे... असो... मनःपूर्वक धन्यवाद !!," असा टोला नरेश मस्केंनी संजय राऊतांना लगावला आहे.
Edited By : Akshay Sabale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.