Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar News : शिंदे - फडणवीस - पवार सरकारचे पुढचे 'टार्गेट' रोहित पवार ? उद्योगमंत्री सामंतांनीही बैठकीकडे फिरवली पाठ

Maharashtra Politics : ...आता शरद पवार समर्थक आमदारांना सत्तेची 'हवा' दाखवण्याचे 'उद्योग' सुरू झाले आहेत.

संजय मिस्कीन

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात मंजूर झालेल्या एमआयडीसीसंबंधीचा जीआर काढण्याच्या मागणीसाठी विधानभवनाच्या आवारातच सोमवारी उपोषणाचं शस्त्र उपसलं होते. काही तासांनंतर उद्योगमंत्री उदय सामंतांनी त्यांची भेट घेतल्यानंतर पवारांनी उपोषण मागे घेतले होते.

तसेच विधानसभेत मंगळवारी दुपारी दोन वाजता बैठक घेण्याची ग्वाहीही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली होती. पण सामंतांचे बैठकीचे आश्वासन हवेतच विरल्याचे समोर आले आहे. याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीदेखील सभागृहातच रोहित पवारांना खडे बोल सुनावले. याच धर्तीवर शिंदे- फडणवीस- पवार सरकारचे पुढचे टार्गेट रोहित पवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे.

भाजपचा कट्ठर विरोधीपक्ष राष्ट्रवादी उभी फूट पाडून शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता शरद पवार समर्थक आमदारांना सत्तेची 'हवा' दाखवण्याचे 'उद्योग' सुरू झाले आहेत. याचा पहिला फटका कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना बसला असून मंगळवारी विधानभवनात तब्बल पाच तास बैठकीसाठी एका जागेवर बसून देखील उद्योगमंत्री फिरकलेच नाहीत. यावरून रोहित पवार यांची नव्या 'त्रिशूल' सत्तेचे विरोधक म्हणून अशी अवस्था असेल तर बाकी आमदारांचे काय ? असा सवाल विधानभवन परिसरात विचारला जात आहे.

कर्जत-जामखेड या मागास विधानसभा मतदारसंघात उद्योग यावेत म्हणून प्रस्तावित 'एमआयडीसी'च्या मागणीला उद्योगमंत्री सतत 'खो' घालत असल्याने रोहित पवार यांनी विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भर पडत्या पावसात आंदोलन केले. याची सरकारने दखल घेतली. मंगळवारी दुपारी दोन वाजता बैठक घेण्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

अहमदनगर(Ahmednagar)चे जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीचे तमाम वरिष्ठ अधिकारी ठरल्यानुसार दुपारी दोन वाजता बैठकीला हजर झाले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी ऑनलाईन होते. पण बाकी सर्व अधिकारी हातातली कामे सोडून विधानभवनात आले होते. आमदार रोहित पवार यांच्यासह हे सर्व अधिकारी अध्यक्षांच्या दालनाशेजारील बैठक रूममध्ये दोन वाजता बसले.

मंत्री उदय सामंत(Uday Samant) येणार याची वाट पाहू लागले. पण दोनचे अडीच वाजले, तीन वाजले पण मंत्री महोदय फिरकले नाहीत. त्यांच्या कार्यालयातील अधिकारी ते दहा पंधरा मिनिटात येतील असे सांगत होते. अन् हे सर्व बैठकीत वाट पाहत होते. अखेर पाच तास उलटले अन उद्योगमंत्री आज बैठकीत येण्याची शक्यता नाही असा निरोप आला. त्यावेळी उद्योगमंत्री बैठकीच्या दालनाजवळील उपाध्यक्षांच्या दालनातच होते.

हा सगळा सावळागोंधळ पाहून यामुळेच राज्यातील उद्योग परराज्यात का जात आहेत याचे कारण कळते, अशी चर्चा उपस्थितांमधे सुरू झाली. अखेर बैठक रद्द झाली. पण आमदार रोहित पवार यांनी जर कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा अधिसूचना याच अधिवेशनात पारित झाली नाही तर नव्याने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला.

रोहित पवारांचं ट्विट...?

आमदार रोहित पवारांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. माझ्या मतदारसंघातील #MIDCची अधिसूचना काढण्याबाबत मंगळवारी दुपारी २.३० वाजता बैठक घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंतसाहेब यांनी दिल्यामुळं काल उपोषण मागे घेतलं. त्यानुसार मी आणि सर्व अधिकाऱ्यांनी तब्बल साडेचार तास वाट पाहूनही उद्योगमंत्री बैठकीला आले नाहीत.

त्यामुळं माझी तर फसवणूक झालीच पण माझ्या मतदारसंघाचीही फसवणूक करून संपूर्ण राज्यातील युवांविषयीचा दृष्टिकोन या सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिला. विरोधकांना ‘सावत्रभावाची’ वागणूक देण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे.

तरीही माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की #MIDC ची अधिसूचना तातडीने काढून माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय द्या, अन्यथा माझ्या मतदारसंघातील युवांच्या आणि नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता याच अधिवेशनात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही आमदार रोहित पवारांनी ट्विटमध्ये सरकारला दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT