Political Family Sarkarnama
मुंबई

Assembly Election 2024 : तब्बल 19 भावांनी लढवली निवडणूक; 11 जण पोचले विधानसभेत, आठ जणांना आले अपयश...

Maharashtra Political News : कोकणातून राणे बंधू आणि सामंत बंधू हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील नीलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करून कुडाळमधून निवडणूक लढवली होती, तर नीतेश राणे यांनी भाजपकडून कणकवलीतून निवडणूक लढवली होती,

Vijaykumar Dudhale

Mumbai, 24 November : विधानसभेच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय घराण्यांतील अनेक महत्वपूर्ण चेहरे उतरले होते. त्यात भावांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तब्बल १९ भाऊ विधानसभेच्या रणांगणांत उतरले होते, त्यातील ११ भावांची विधानसभेत एन्ट्री झाली असून आठ जणांना पराभावाचे तोंड पाहावे लागले आहे. त्यात कोकणातील राणे आणि सामंत बंधूंचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) अनपेक्षित असे निकाल जाहीर झाले आहेत. महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले आहे. त्या तब्बल १३२ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे मिळून ४९ आमदार निवडून आलेले आहेत, तर तीन अपक्षांचा समावेश आहे.

कोकणातून (Konkan) राणे बंधू आणि सामंत बंधू हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यातील नीलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करून कुडाळमधून निवडणूक लढवली होती, तर नीतेश राणे यांनी भाजपकडून कणकवलीतून निवडणूक लढवली होती, या दोन्ही मतदारसंघातून राणे बंधू हे निवडून आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात किरण सामंत आणि उदय सामंत यांनी शिवसेनेकडून (Shivsena) निवडणूक लढवली होती. यातील माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतून विजय मिळवला, तर त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राजापूर मतदारसंघातून विजयाला गवसणी घातली.

पवार घराण्यातील रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे युवा नेते विधानसभेच्या रणांगणांत उतरले होते. त्यातील रोहित पवार यांचा कर्जत जामखेड मतदारसंघातून निसटता विजय झाला, तर बारामतीत युगेंद्र पवार यांना आपले काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राज्यात मुंबईच्या माहीममधील लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली. या मतदारसंघातून ठाकरे घराण्यातील अमित राज ठाकरे हे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना शिवसेनेच्या महेश सावंत यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले आहे. दुसरीकडे, अमित ठाकरे यांचे चुलत बंधू आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघांतून देशमुख बंधू पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याच्या प्रयत्नांत होते. मात्र, अमित देशमुख हे पुन्हा एकदा विधानसभेत पोचले असून धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून पराभव पत्करावा लागला आहे. बीडच्या क्षीरसागर घराण्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर या दोन बंधूंमधील लढाईत संदीप यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून त्यांनी आपले बंधू योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.

चांदवड मतदारसंघात राहुल आहेर आणि केदार आहेर या बंधूंमध्ये आमदारकीसाठी लढत झाली, यात भाजपचे राहुल आहेर यांनी अपक्ष लढत असलेल्या आपल्या भावाचा म्हणजेच केदार आहेर यांचा पराभव केला आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे वांद्रे पश्चिममधून पुन्हा एकदा विधानसभेत पोचले आहेत. त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मात्र मालाड पश्चिममधून पराभवाला सामोरे जावे लागले.

गावित बंधूंना झटका

नंदूरबारमधील गावित कुटुंबीय हे राजकारणातील मातब्बर घराणे म्हणून राज्यात ओळखले जाते. या घराण्यातील विजयकुमार गावित, राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित हे बंधू एकाच वेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यातील फक्त विजयकुमार गावित यांना विजय मिळवता आला आहे. मात्र, राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित यांना विधानसभेत पोचण्यात अपयश आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT