Mumbai News : मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी समाज आता कोर्टातील लढाईसाठी सज्ज झाला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसुचनेला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आलेलं आहे. 'ओबीसी वेलफेयर फाउंडेशन'च्या वतीने अॅड. मंगेश ससाणे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा-ओबीसी हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. (OBC Reservation News)
सगेसोयरे व गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्रांद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारीच्या शासन अधिसुचनेला ओबीसी संघटनेने कोर्टात आव्हान दिले आहे. राज्यघटनेच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. सगेसोयरे यांची व्याख्या कशी चुकली आहे? हे या याचिकेत सांगण्यात आलं आहे. हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या संदर्भात सुनावणी लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात मराठा नेत्यांच्या विरोधात ओबीसी नते उभे ठाकल्याचे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी विविध विषयांवर ठराव केला आणि मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा दर्शवत पुढील रणनीती आखणीला सुरुवात करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 5 तारखेपासून राज्यातील सर्व ओबीसी नेते राज्यभर देवदेवतांचे आशीर्वाद घेत दौरे करणार आहेत. हे दौरे पूर्ण झाल्यावर 20 तारखेला छत्रपती संभाजी नगरमध्ये मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी छगन भुजबळ यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ओबीसी एल्गार दिसणार आहे. (High Court On Maratha Reservation)
मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधात आवाज उठवला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्यात आता राज्याचे ओबीसी नेते एकवटले आहेत. केवळ सरकारमधील नाही तर विरोधातले नेते देखील एकवटले आहेत. छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला पाठिंबा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी लढाई देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या उपोषणाला बसण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सगेसोयरे संदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं. पुढील 15 दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून, हा कायदा पारीत करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेलं नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यावरून मनोज जरांगे पाटलांनी आता सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं. (Latest Political News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.