OBC Community Stand : मराठा आरक्षणाबाबत सरकारने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा देता येणार नसल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने म्हटले आहे. महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याचे वाटत नाही. अशात भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी नाशिक मध्ये ओबीसी नेत्यांची बैठक झाली. त्यात सरकारच्या निर्णयावर नाराजी, संताप व्यक्त करण्यात आला. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना मागील दाराने ओबीसीत समाविष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे,अशी टीका भुजबळ यांनी केली.
भुजबळ यांच्या या भूमिकेबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना मागच्या दाराने ओबीसीत समाविष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली. त्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. छगन भुजबळ यांच्या या भूमिकेशी आपण सहमत नाही. सरकारच्या अधिसूचनेबाबतच्या निर्णयामुळे ओबीसींवर कोणताही अन्याय झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने मागील दोन दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयांचा अभ्यास केला. यासंदर्भात अनेकांची मते जाणून घेतली. त्यानंतरच आपण भूमिका मांडली. मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा अशा ज्या लाखो नोंदी सरकारला सापडल्या आहेत, त्यातील जवळवास 99.99 टक्के नोंदी बऱ्याच जुन्या आहेत. त्यापैकी अनेकांजवळ आधीपासूनच जातीचे प्रमाणपत्र आहे. ज्यांच्या नोंदी असतील त्यांना त्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कायदाच आहे. त्यामुळे सरकारने नवीन काही तरी केले, असे अजिबात वाटत नसल्याचे डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अन्यायच झाला नसल्याने भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन देता येणार नाही. असे असले तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्वांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा लागेल, असे डॉ. तायवाडे म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही याबाबत भाष्य केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही पक्षाची भूमिका आहे. छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची नसून ती त्यांच्या समता परिषदेची आहे, असेही पटेल यांनी गोंदियात बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.