Uddhav Thackeray vs State Government : 'मोदी आडनावा'वरुन केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी. त्यानंतर परदेशात जाऊन राहुल यांनी भारताच्या लोकशाहीवर शंका उपस्थित केल्याने प्रतिमा मलिन झाली, असा आरोप करून त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी वारंवार भाजपच्या वतीने करण्यात येत होती.
दरम्यान, 'मोदी आडनावा'वरील विधानामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. त्यामुळे गांधी यांची खासदारकीही रद्द झाली. मात्र राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला. भाजपच्या मागणीवर त्यांनी, 'मी माफी मागायला सावरकर नाही. गांधी आहे. गांधी कधी माफी मागत नाहीत', असे विधान केले.
माफीवरून राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात, असे म्हणत भाजपने देशभर राहुल गांधी यांच्याविरोधात मोहीम चालविली. तर महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना-भाजपने सावरकरांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. दरम्यान, २ एप्रिल रोजी ठिकठिकाणी सावरकर यात्रा पार पडली. दरम्यान, राहुल गांधींच्या सावरकरांच्या विधानांवरून राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
नाशिकच्या मालेगाव सभेतून उद्धव ठाकरे यांनी 'सावरकर आमचे दैवत आहे, त्यांचा आपमान सहन करणार नाही', असा इशारा दिला होता. तसेच दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीला ठाकरे गटातील खासदार उपस्थित राहिले नाहीत. त्यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर राहुल गांधी यांनीही यापुढे सावरकर यांच्यावर बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
सध्या राज्यात सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांची सुरूवात झालेली आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्राचे आयोजन केले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. आता सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटही मैदानात उतरला आहे.
एकीकडे भाजपकडून राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत असताना आता शिवसेनेनेही सावरकरांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी 'घर घर सावरकर' कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांच्यासह अनेक व्याख्याते राज्यभरात व्याख्यान देणार आहेत. त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून ठाकरे गट सावरकरांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. त्या मोहिमेची तयारी सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.