Panvel Election 2025: पालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. ७८ प्रभागांपैकी २१ जागा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहेत, तर सहा जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित असल्याने माजी नगरसेवकांसाठी ही बाब दिलासादायक ठरली आहे.
या आरक्षण प्रक्रियेत काही प्रभागांमध्ये नव्या राजकीय समीकरणांचा ताळमेळ घालावा लागणार आहे. सोडतीदरम्यान प्रभाग क्रमांक १८ या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन जागा व एक सर्वसाधारण जागा घोषित झाली. या प्रभागावर आमदार विक्रांत पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा प्रभाव आहे. या वेळी दोघेही निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा असून, त्यांच्या अर्धांगिनींना उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या प्रभागात शिवसेनेचे महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोबत, तसेच भाजपमधील डॉ. सुरेखा मोहकर आणि प्रीती जॉर्ज म्हात्रे यांचीदेखील नावे चर्चेत आहेत. त्यामुळे युती झाल्यानंतर तिकीटवाटपाचे समीकरण गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक १९ मध्ये एक सर्वसाधारण आणि एक ओबीसी अशी दोन आरक्षणे आहेत. एका जागेवर परेश ठाकूर पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. येथे रुचिता लोंढे आणि दर्शना भोईर नगरसेविका होत्या. सुरक्षित प्रभाग असल्याने नवीन इच्छुकांनीही रस दाखवला असून, तिकिटासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे.
नवीन पनवेलमधून प्रकाश बिनेदार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे, तर कामोठे प्रभागातील राखीव जागेसाठी भाजपकडून सचिन गायकवाड यांना संधी मिळू शकते. गेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सोमोरे जावे लागले होते. त्यानंतर शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश करून संघटनात सक्रिय भूमिका घेतली आहे. प्रभाग क्रमांक ११, १३ आणि ६ या ठिकाणी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३ आणि ९ या ठिकाणी अनुसूचित जमातींसाठी आरक्षण निश्चित झाले असून, प्रभाग ३ मध्ये महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे.
पनवेल पालिकेतील माजी नगरसेवकांसाठी राजकीय पुनरागमनाचे दार खुले झाले आहे. अनेक प्रभागांमध्ये महिला आरक्षण आल्याने नव्या चेहऱ्यांनादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत संभाव्य युती, आघाडीच्या समीकरणांना वेग येण्याची चिन्हे आहेत.
पनवेलकरांसाठी काम करण्याची मोठी संधी आहे. आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना राजकारणात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करून शहराच्या विकासात वाटा उचलण्याचा माझा निर्धार आहे, असं तुकाराम सरक नामक एका संभाव्य उमेदवारानं प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.