Mumbai, 13 January : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या बुधवारी (ता. १५ जानेवारी) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नौसेनेच्या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यानंतर मोदी हे राज्यातील महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. अमित शाह यांनी संसद ते पंचायत फक्त भाजपच असा नारा दिला आहे, त्यामुळे महायुतीच्या आमदारांना मोदी कोणता कानमंत्र देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे प्रथमच महाराष्ट्र-मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे मोदींच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. पंतप्रधान मोदी हे बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. त्यांच्या हस्ते नौदल डॉकयार्ड येथे आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
युद्धनौकांचे लोकार्पण झाल्यानंतर दुपारी तीननंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील (Mumbai) खारघर येथील नऊ एकर क्षेत्रावरील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या मंदिर परिसारात अन्य देव-देवतांची मंदिरे आहेत. वैदिक शिक्षण केंद्र, संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र निर्माण केलेले आहे.
युद्धनौकांचे लोकार्पण आणि मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आमदारांसोबत स्नेहभोजनदेखील घेणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील आमदारांना थेट मोदींशी संवाद साधता येणार आहे.
महाराष्ट्रातील महायुतीच्या विक्रमी विजयानंतर मोदी कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महायुतीच्या आमदारांना मोदी काय कानमंत्र देणार? याकडे लक्ष असणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. १२ जानेवारी) शिर्डीत झाले. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंचायत ते संसद फक्त भाजप असा नारा दिना आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना बसायला जागा राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
अमित शाह यांच्या पंचायत ते संसद भाजप, असा नारा दिल्यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांपुढे कोणता नारा देणार, काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. तसेच, महाराष्ट्रासंदर्भात नवीन काही घोषणाही ते करणार का, याकडे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.