
Mumbai News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. पण शनिवारी (ता.11) ठाकरे गटाने स्वबळाचा नारा देत राज्यातील राजकीय वातावरण गरम केलं. खासदार संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा दिला. यावरून शिंदे गटाने आता टीका केली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते मालाड पूर्वमधील कुरार व्हिलेजमध्ये आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.
मुंबई महानगरपालिकासेह राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणुक कधीही जाहीर होऊ शकते. यासाठी महायुतीने एकसंघ राहत काम करण्याचे धोरण स्वीकारल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी जाहीर केले. मात्र महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव दिसत असून कोणतीच रणनीती समोर येत नाही. उलट स्वबळाचा नारा नेते देतात दिसत आहेत. राऊत यांनी देखील स्वबळाचा नारा देताना, पक्षातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी एकटे लढण्याची घोषणा केली आहे.
यामुळे आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही निशाना साधला आहे. कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्याशी जवळीक ठेवायची नाही याचा याचा विचार करावा, असाही सल्ला कदम यांनी दिला आहे.
कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करताना, ठाकरे यांच्याकडे मुंबईची सत्ता होती. 35 वर्ष महानगरपालिका त्यांच्या हातात होती. मात्र त्यांच्याच काळात मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मराठी माणसाला ठाकरे यांनी उद्धवस्त केलं असा घणाघात कदम यांनी केला आहे. तर ठाकरे यांना मराठी माणसाचा मुद्दा उचलण्याचा त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करताना कदम म्हणाले की, हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत आज ठाकरे बोलतायतं. पण त्यांनीच शिवसेनाप्रमुखांचे विचार पायदळी तुडवले. त्यांच्या विचारांशी बेईमानी केली. काँग्रेसच्या दावनीला शिवसेना नेली. यामुळे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाण्याचा कोणताही अधिकार नसल्याचेही कदम यांनी म्हटले आहे.
तसेच कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. ते ठाकरेंचं पिल्लू, ज्याला पेंग्विन म्हणतात, तो हल्ली कुठे जातोय माहिती आहे का? कोणाला भेटतोय याची काही माहिती आहे का? तर तो सध्या फडणवीसांना भेटतोय. याचे कारण कोणाला माहित नसेल, तो दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामुळे जात आहे. हे प्रकरण फडणवीस यांनी बाहेर काढलं तर याला बर्फाच्या लादीवर झोपवून फटके बसतील. या भीतीपोटी तो फडणवीस यांना भेटतोय असा दावा कदम यांनी केला आहे. तर फक्त स्वतःला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे आता देवा भाऊ.. देवा भाऊ… असा जप करत असल्याचा दावा देखील कदम यांनी केला आहे.
कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या फडणवीस भेटीवर देखील टीका केली. ते म्हणाले, याआधी त्यांनी फडणवीसांवर टीका केली. तू राहशील नाहीतर... मी तर असे ते म्हणत होते. पण आता मोठा फुलांचा बुके घेऊन फडणवीस यांना ते भेटत आहेत. यामुळे आता असे अचानक बदणाऱ्यांबाबत फडणवीस यांनी योग्य तो विचार करावा, असेही आवाहन रामदास कदम यांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.