Prithviraj Chavan News
Prithviraj Chavan News Sarkarnama
मुंबई

Prithviraj Chavan News : 'स्टेटस' काढणाऱ्या आंबेडकरांना पृथ्वीराज चव्हाणांचं जशास तसं प्रत्युत्तर...

Chetan Zadpe

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीत समावेशाबाबत चर्चांवर चर्चा घडल्यानंतर अखेर त्यांनी महाविकास आघाडीशी फारकत घेत स्वतंत्र मार्ग चोकाळला. यानंतर वंचित आणि महाविकास आघाडीत जोरदार टीका-टिप्पणी, आरोप प्रत्यारोप होऊ लागले. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही, असे म्हणत मी स्टेटस असणाऱ्या नेत्यांशी चर्चा करतो, अशा शब्दांत आंबेडकरांनी चव्हाणांना डिवचले होते. आता यावर स्वत: चव्हाण यांनी पुन्हा पलटवार केला आहे. (Latest Marathi News)

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले, "वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसवर जे काही आरोप करायचे आहेत ते करू द्या. काँग्रेसला भाजपची ए टीम-बी टीम म्हणायचं असेल तर म्हणू द्या, ते लोकांनाही पटलं पाहिजे ना? गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 19 टक्के मते मिळाली. ज्या पक्षाला इतकी मते मिळाली, त्या पक्षाला ए टीम, बी टीम म्हणणार असतील काय बोलणार?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझ्याशी चर्चा करो म्हणालो नाही -

"मी त्यांना (प्रकाश आंबेडकर) यांना कधीच माझ्यासोबत बसा आणि चर्चा करा, असं म्हणालो नाही. त्यांना मी नेहमी हेच म्हणालो की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबतच चर्चा करा. आंबेडकर सोबत आले पाहिजे, त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले. मात्र ते आले नाहीत," असे चव्हाण म्हणाले.

वंचितची दोन टक्के मतं -

"मागील निवडणुकांमध्ये एमआयएम आणि वंचित आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) असे समीकरण असल्यामुळे त्यांना जवळपास सात टक्के मतं मिळाली होती. यामुळे काँग्रेसच्या सात जागा पडल्या होत्या. मात्र या वेळी परिस्थिती वेगळी आहे. एमआयएम सोबत नसल्याने त्यांची चार पाच टक्के मते कमी झाली. उरलेली दोन टक्के मते वंचितला मिळू शकतात," असेही चव्हाण म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी रस दाखवला नाही -

आम्ही मत विभाजन टाळता यावं यासाठी वंचितला सोबत घेण्याचा खूप प्रयत्न केले. कोणत्या जागा पाहिजे हेदेखील विचारलं. मात्र व्यावहारिक जागा मागितल्या नाहीत. तीन पक्षांची आघाडी करताना काही अडचणी निर्माण होत असतात. ते स्वत: बैठकीला यायचं नाही, कोणत्यातरी ज्युनिअर नेत्यांना पाठवायचं. आघाडीबाबत सतत अपमानास्पद विधाने करायची असा त्यांनी प्रकार सुरू ठेवला, असा आरोप चव्हाण (Prutviraj Chavan) यांनी केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT