Rahul Narwekar Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar : हे तर महाराष्ट्राचं भाग्य; राहुल नार्वेकरांची मोदींवर स्तुतिसुमने, म्हणाले...

Jui Jadhav

Mumbai Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातच दुसऱ्यांदा दौऱ्यावर येत आहे. मोदींच्या वाढलेल्या दौऱ्यावर भाजपने राज्यातील सर्व्हे जास्तच मनावर घेतल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे. दरम्यान, सोलापूर दौऱ्यादरम्यान अनेक विकासकामांची उद्घाटने करण्यात आली. राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज सोलापूरमधील अनेक विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतदेखील काही प्रकल्प आहेत, त्याचेही लोकार्पण होणार आहे. यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मोदींच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, 'हे आपले भाग्य आहे, की मोदीजी महाराष्ट्रामध्ये आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेच्या हिताच्या आणि विकासकामांसाठी ते वारंवार राज्याचा दौरा करीत आहेत. त्यामुळे हे सगळ्यांचेच भाग्य आहे.'

विरोधकांकडून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, 'आदरणीय मोदीजी आज राज्यात आहेत. राज्यातील मोदीसाहेबांचे वाढते दौरे बघता मागील सर्व्हे भाजपने चांगलाच गांभीर्याने घेतल्याचे दिसते. त्यासाठीच पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा मागे लावून साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.'

'विकासपुरुष' ही मोदीसाहेबांची प्रतिमा आहे आणि याच प्रतिमेला बघून अनेक जण भाजपवासी झाले असल्याचे सांगतात. आज राज्यात कापसाला भाव नाही, निर्यातीच्या धोरणामुळे कांदा, सोयाबीन, द्राक्ष, तूर उत्पादक शेतकरी हताश आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती प्रक्रिया, बेरोजगारी यामुळे युवावर्ग निराशेच्या गर्तेत आहे, याकडे फुटीरांचे दुर्लक्ष होत आहे,' याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कमर्चारी, कंत्राटी कर्मचारी यांसारखे अनेक घटक आज आंदोलने करीत आहेत. मराठा-धनगर-मुस्लिम-लिंगायत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, परंतु या सर्व प्रश्नांकडे राज्यसरकारच्या धुरिणांचे लक्ष जात नाही. आदरणीय मोदीसाहेब आपण महाराष्ट्रात आहात, किमान आज तरी अस्वस्थ आणि रखरखत्या (Maharashtra) महाराष्ट्राच्या मनाची बात करावी, ही मराठी मनाची अपेक्षा आहे. ही अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल ही आशा आहे,' असे आवाहनही पवारांनी केले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीदेखील या दौऱ्यावर टीका केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सारखं, वारंवार महाराष्ट्रात यावं लागत असेल म्हणजे हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील जे सरकार आहे त्यांना कामं जमत नाहीत, म्हणून मोदींना यावं लागतं आहे,' अशी टीका देशमुखांनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT