Devendra Fadnavis News Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : "गृहमंत्री महोदय…गाडीखाली कुत्रं नाही तर जिवंत माणसं..!"; 'या' नेत्याचा संयम संपला

Mahayuti Government News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदाराने ट्विट करून महायुती सरकार तसेच गृहविभागाचे वाभाडे काढले आहे.

Deepak Kulkarni

Pune News: पुण्यातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या मद्यधुंद अवस्थतेतील मुलाच्या आलिशान पोर्शे कारने दोन जणांना उडवले. त्यात युवक युवतीचा मृत्यू झाला. या अपघातामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तालयात भेट देत पत्रकार परिषदही घेतली. पण या प्रकरणामुळे विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवरुन सरकारविरोधात रान उठवलं आहे.

या प्रकरणाची धग कायम असतानाच इंदापुरात आणखी एक धक्कादायक घटना घडली.त्यात तहसीलदारांवर हल्ला करून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढत्या गुन्हेगारीचं खापर अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्यावर फोडले जात आहे. याचवेळी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (ता.24)ट्विट करत गृहमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट फडणवीसांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या अशी मागणी करत पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

रोहित पवारांचं नेमकं ट्विट काय..?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून महायुती सरकार तसेच गृहविभागाचे वाभाडे काढले आहे. देवेंद्र फडणवीससाहेब, तुम्ही म्हणाला होतात की,‘‘ गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जिवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भरदिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही!कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता…आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या! देवेंद्र फडणवीससाहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’असंही रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या..?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली.त्या म्हणाल्या, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना असल्याचेही सुळे म्हणाल्या.

गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेधही आपल्या ट्विटमधून केला आहे.

इंदापुरातील धक्कादायक घटना...

इंदापुरात आज धक्कादायक प्रकार समोर आला. तहसील कार्यालयाच्या जवळच असलेल्या चौकात काही अज्ञात गुंडांनी तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला केला. अज्ञात आरोपींनी तहसीलदारांच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तसेच गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत तहसीलदार थोडक्यात बचावले आहेत. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT