Shivsena mumbra Shakha war: मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवरून शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट आमने-सामने आल्याने वाद चिघळला आहे. बुलडोजर फिरवून शाखा पडलेल्या ठिकाणी शनिवारी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावरच दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फोडले जात आहेत. शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जहरी टीका केली होती. त्यानंतर मुंब्रा्यात झालेल्या गोंधळानंतर शिंदेंनीही रविवारी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार असे दिसते.
ठाण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना एकनाथ शिंदेनी यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. सध्या ठाण्यात दिवाळीपूर्वीच आतषबाजी सुरू झाली असून शनिवारी शहरात काही फुसके बार आले होते. हे बार जे न वाजताच निघून गेले. दुसरीकडे शिवसैनिकांचे फटाके असे काही वाजले की त्यांना माघार घ्यावी लागली, अशा शब्दांत शिंदेनी टीका केली.
माज उतरविण्याची भाषा करणाऱ्या मंडळींना जनतेनी आता सातव्या नंबरवर पाठवले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून अशास्वरुपाची दुसऱ्यांवर केलेली टीका शोभत नाही, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून तरुणाईचा मोठा उत्साह पहावयास मिळत आहे. त्यांच्या प्रतिसादामुळे बळ मिळते.
मुंब्य्रातील शिवसेना शाखा तोडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. याच शाखेच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे मुंब्रा्यात आले होते. मात्र पोलिसांच्या विनंतीमुळे त्यांना माघारी जावे लागले. मी मुद्दाम या ठिकाणी आलो. सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. हे नेभळट असून चोर आणि गद्दार आहेत. हे नामर्द पण आहेत. अशी नामुष्की महाराष्ट्राला याआधी कधी आली नाही", अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर सडकून टीका केली होती.