पंकज रोडेकर
Thane news : ठाणे शहरात धावणाऱ्या मेट्रोला कधी गती मिळणार हे अद्यापही स्पष्ट नाही. त्यातच शिवसेना शिंदे गटाने दिवेकरांना जलद गतिमान प्रवासासाठी दिवा शहर मेट्रोने जोडणार अशी निवडणुकीच्या तोंडावर घोषणा केली आहे. यावरून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने आधी दिवा रेल्वे स्थानकातून दिवावासियांसाठी स्वतंत्र लोकल सुरू करा आणि मग दिव्यातील नागरिकांना मेट्रोचे गाजर दाखवा,असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर केला.
यापूर्वी दिव्यात भाजप आणि शिवसेना असा सामना रंगताना दिसत होता. पण, मध्यंतरी शिंदे गटाने भाजपला कारशेडचा रस्ता दाखवत सायडिंगला टाकले आहे. त्यामुळे दिव्यात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे गट असाच सामना रंगतोय आणि रंगताना दिसण्याची दाट शक्यता आहे. दिवा शहराच्या सर्वांगीण विकासाला शिंदे सरकारची गती ! अशी सोशल मीडियावर शिंदे गटाने ब्रँडिंग सुरू केल्याने दिवेकरांना दाखवलेले स्वप्न सत्यात उतरते की ते दिवास्वप्न राहते हे लवकरच स्पष्ट होईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिवा म्हटले की समोर येते समस्यांचे माहेरघर. यामध्ये फूटपाथ, पिण्याचे पाणी, गटारे येवढेच काय तर सात ते आठ लाखांच्या घरात लोकसंख्या गेलेल्या दिव्यात महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय सोडा, साधे प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा नाही. तर, दिव्यातील मतदारांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी दिवेकरांना 'दिवास्वप्न' दाखविण्याशिवाय कोणतेही कामे करत नाही. स्वस्तात मिळणाऱ्या घरामुळे येथे नागरीकारणाने लोकसंख्या वाढली. पण त्यांना ये-जा करण्यासाठी लोकल शिवाय दिव्यात दुसरी पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे सकाळी लोकलमध्ये चढताना कसरत आणि सायंकाळी उतरताना मेंढरासारखी गर्दी स्थानकात पाहण्यास मिळते.
त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलद गतिमान प्रवासासाठी दिवा शहर मेट्रोने जोडले जाणार असे म्हटले. यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हल्लाबोल करत कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. या गटाने आधी दिवा रेल्वे स्थानकातून दिवा वासियांसाठी स्वतंत्र लोकल सुरू करा आणि मग दिव्यातील नागरिकांना मेट्रोचे गाजर दाखवा असे म्हणून जणू शिंदे गटाला डिवचले आहे. त्यामुळे आता सेना विरुद्ध सेना यांच्यात वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दिव्यातून 8 लोकप्रतिनिधी ठाणे महापालिकेवर निवडून जातात. दिव्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. 8 ही लोकप्रतिनिधी शिवसेनेचे असून भाजपला अद्यापही येथे खाते उघडता आलेले नाही. शिवसेना फुटल्यानंतर आठ पैकी सात लोकप्रतिनिधींनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर एक लोकप्रतिनिधी राखण्यात ठाकरे गटाला यश आले आहे. त्यातच लोकसंख्या वाढल्याने लोकप्रतिनिधींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदा दिव्यातील पाणी योजनेच्या उद्घाटनाला गेले होते. त्यानंतर, नुकतेच ते दिवा महोत्सवासाठी दिव्यात गेले. पहिल्या दौऱ्यातील भाषण जवळपास दुसऱ्या दौऱ्यात सारखेच त्यांनी केले. याशिवाय फक्त जलद गतिमान प्रवासासाठी दिवा शहर मेट्रोने जोडले जाणार, शहरातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी 10 एमएलडी अतिरिक्त पाणी,मुंब्रा दिवा रस्ता अद्यावत शासकीय रुग्णालय, स्वतंत्र पोलीस स्टेशनचे काम लवकरच होणार पूर्ण अशा घोषणा केल्या आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघात दिवा शहर येतो. त्यातच एकनाथ शिंदे गटाचे सात लोकप्रतिनिधी असल्याने येथील मतांवर लक्ष ठेवून शिंदे गटाकडून घोषणाबाजी होत आहे. त्यानुसार मतांसाठी फिल्डिंग लावण्याचे काम केले जात आहे. त्यातच शिंदे पितापुत्रांचे दिव्यात अजून विकासकामांच्या उद्धाटनासाठी दौरे सुरू आहेत. नुकत्याच दिवा महोत्सव मुख्यमंत्री शिंदे यांनी मेट्रोची तसेच इतर ही घोषणा करून जणू फिल्डींग तर लावली नाही ना? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.