Sandip Karnik, Manoj Jarange Patil sarkarnama
मुंबई

Maratha Reservation News : जरांगेंच्या आंदोलनावर SIT स्थापन होणार; संदीप कर्णिक करणार चौकशी

Umesh Bambare-Patil

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या हिंसक घटना आणि इतर बाबींची चौकशी करण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात एसआयटी चौकशीची घोषणा सरकारकडून झाली होती. त्यानुसार नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. तसेच याची तपासणी करुन आगामी तीन महिन्यात अहवाल देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी मध्यंतरी आपल्या भाषणांतून भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. या टीकेनंतर सत्ताधारी आमदारांनी सभागृहात आक्रमक होत जरांगे पाटील यांच्या या वक्तव्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी मान्य करत एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार गृहविभागाने आज एसआयटी स्थापन केली आहे. यासंदर्भात गृहविभागाने दिलेल्या आदेशात म्हटले की, विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७ फेब्रुवारी रोजी राज्यातील आरक्षण आंदोलनातील हिंसा पूर्व नियोजित होती का याविषयाची चर्चा झाली आहे. या चर्चेच्या अनुषंगाने विधानसभेचे सभापती यांनी या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून सखोल चौकशी करावी, अशी आदेश दिले आहेत.

त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandip Karnik) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे. राज्यात आरक्षणाविषयी विविध ठिकाणी आंदोलने सुरु असताना आंदोलनाचा गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा, वातावरण असिथर करण्यासाठी जाळपोळ, दगडफेकीसारख्या हिंसक घटना जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करणे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच मीडिया, सोशल मीडियाचा गैरवापर करुन चुकीची माहिती देऊन तसेच अफवा पसरवून दंगे भडकवण्याचा प्रयत्न करणे आदी बाबींची चौकशी व तपास करुन तीन महिन्यात अहवाल शासनास सादर करावा, असे म्हटले आहे. तसेच या पथकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ञ व्यक्तींना बोलावण्याचे अधिकारही विशेष तपास पथकाचे प्रमुख यांना असतील. तसेच आवश्यक मनुष्यबळ शासनाच्या सहमतीने नियुक्त करण्याचे अधिकार ही विशेष तपास पथक प्रमुखांना असतील असेही नमुद करण्यात आले आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT