Neelam Gorhe Sarkarnama
मुंबई

Neelam Gorhe Big Statement : ''...म्हणून मी मृत्यूची वाट पाहत होते !''; शिंदे गटात प्रवेश केलेल्या नीलम गोऱ्हेंचं खळबळजनक विधान

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. यात एकनिष्ठ असलेल्या नेत्यांनीही ठाकरेंची साथ सोडली. काही दिवसांपूर्वीच विधान परिषेदच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलं होतं. त्यानंतर काहीच दिवसांत ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. पण आता गोऱ्हे यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे(Neelam Gorhe) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्यामागचं कारणासह विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं. गोऱ्हे म्हणाल्या, ठाकरे गटात संवादाचा अभाव आहे. मी कोणतही पद डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटात गेलेले नाही असं स्पष्टीकरण देतानाच लोक म्हणायचीत तुम्हाला अॅक्सेस आहे, पण या अॅक्सेसचा काय उपयोग असंही गोऱ्हे म्हणाल्या.

'मला त्यांनी भरपूर पदं दिली. मला त्यांनी काय द्यायचं ठेवलं नाही, पण मी या कार्यपद्धतीला कंटाळून मृत्यूची वाट पाहत होते, यात बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही उपसभापती करता पण, तुम्हाला नेता करावेसे वाटले नाही. अनेकवेळा शिवाजी पार्कवर बोलायला दिले. पण महत्वाच्या निर्णयावेळी बोलावलं जात नव्हते असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केले.

शिंदे हे कृतीशील आणि समजूतदार...

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, असं एकदिवस उजाडला आणि पक्षांतर झालं असं कधी होत नाही. त्याच्यात माणसं तुमच्याशी कसं वागताय, तुमच्यासमोर मुद्दे कोणते येताहेत.अनेक बाबतींमध्ये पक्ष काय भूमिका घेतोय. यावर बर्याचशा गोष्टी अवलंबून असतात. जानेवारीमध्ये माझी आई आजारी पडली. त्यातच तिचं निधन झालं. ते एकच कारण आहे असं मी म्हणणार नाही. त्याकाळात उध्दव ठाकरेंचे फोन वगैरे आले. पण आम्ही दोघी बहिणीच त्यावेळी होतो. आम्हीच ते क्रियाकर्म केले.

मात्र, एकनाथ शिंदे(Eknath Shinde) ताबडतोब भेटायला आले. माझी अपेक्षाही नव्हती. आम्ही त्यांना निरोपही दिला नव्हता. पण ते स्वत: भेटायला आले. एक दिवसांत परत देवेंद्र फडणवीस भेटायला आले. आणि त्याच्यानंतर साहेबांनी फोन वगैरे केला. पण त्यावेळी मला असं वाटलं की, एकनाथ शिंदे हे कृतीशील आहेत. आणि जास्त समजूतदार आहेत असंही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

ठाकरेंच्या कार्यपध्दतीला मी थकून गेले होते...

दुसरं म्हणजे आपण सातत्यानं आपण मेसेज करायचे. आणि त्यानंतर उत्तर आले तर आले. नाहीतर नाही. मग अशावेळी आपल्याला जे वाटलं ते करुन मोकळे व्हायचं. मग कधी महिना लागेल,कधी पंधरा दिवस तर कधी चार तास. तर कधी उत्तरच येणार नाही. या कार्यपध्दतीला मी थकून गेले होते. खरंच असं कुठल्याही नेत्यासोबत काम करणं शक्य नाही असंही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

''...यात राऊतांचा बळी गेला!''

संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मला खूप मदत केली आहे. त्यांनी मला अडचणींच्या काळातही मदत केली आहे आणि माझ्या आमदारकीच्या वेळीही मदत केली आहे. हा एक भाग झाला तसंच त्यांचं लिखाण हे देखील खूप उत्तम आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण ते जे काही बोलतात त्यावेळी त्यांना जे सांगितलं जातं तेच संजय राऊत बोलतात.

ज्यांना आक्रमक बोलायचं नाही पण आक्रमक बोलणारा माणूस पाहिजे असं म्हणून ती राऊत यांच्याकडे भूमिका आली. त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. या सगळ्यात संजय राऊतांचा काही प्रमाणात बळी गेला असं मला वाटतं असं खळबळजनक विधानही नीलम गोऱ्हे यांनी या मुलाखतीत केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT