Salim Kutta News Sarkarnama
मुंबई

Salim Kutta News : "मी तुम्हाला कुत्र्यासारखा दिसतो का? माझ्या नावापुढील 'कुत्ता' टॅग हटवा..."

Anand Surwase

Mumbai News : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, या सर्व प्रकरणात सलीम कु्त्ता या विचित्र नावाची चर्चाही जोरदार रंगत आहे. अनेकांना "कुत्ता" हे नाव ऐकूनच कुतूहल निर्माण झाले असेल. मात्र, या कुख्यात गुडांचे खरे नाव हे मोहम्मद सलीम मीरा शेख असे असून, अंडरवर्ल्डमध्ये त्याला सलीम कुत्ता या नावानेच ओळखले जाते. तसेच एकवेळ सलीम कुत्तालादेखील 'कुत्ता' नावाची लाज वाटली होती.

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या कटात सहभाग असल्याने मोहम्मद सलीम मीरा शेख ऊर्फ सलीम कुत्ता याला बॉम्बस्फोट खटला चालवणाऱ्या टाडा न्यायालयाने (Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो दाऊदचा खास हस्तक म्हणूनही ओळखला जातो. कुत्ता याने मुंबई हल्ल्यात दाऊदचा आणखी एक हस्तक मोहम्मद डोसासाठी काम करताना समुद्र किनाऱ्यावर शस्त्रास्त्रे उतरवून घेतली होती. त्यामुळे त्याला मुंबई हल्ल्यातील कटात दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान, सलीम कुत्ता हा पॅरोल रजेवर आला असताना शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यासोबत पार्टी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि पुन्हा एकदा सलीम कुत्ता या नावाची चर्चा सुरू झाली.

सलीम शेखला वाटली होती कुत्ता नावाची लाज

सलीम शेख याला 'कुत्ता' (Salim Kutta) या नावाची ओळख त्याच्या क्रूरतेमुळे प्राप्त झाली होती. तो त्याच्या विरोधकांवर हल्ला करताना चवताळून तुटून पडायचा आणि त्यांची निर्घृण हत्या करायचा. त्यामुळे अंडरवर्ल्डमध्ये त्याची ओळख एखाद्या जंगली कुत्र्याप्रमाणे हल्ला करणारा सलीम कुत्ता अशीच झाली होती.

दरम्यान, बॉम्बहल्लाप्रकरणी आरोपपत्रातदेखील त्याच्या नावाचा उल्लेख हा सलीम कुत्ता असाच करण्यात आला होता. न्यायालयीन चौकशी दरम्यान वारंवार त्याचा उल्लेख सलीम कुत्ता असाच केला जात होता. यावरून सलीम कुत्ता यालाही 'कुत्ता' या नावाची लाज वाटली होती. त्यामुळे त्याने त्याच्या नावापुढील कुत्ता हा टॅग हटवण्याची विनंती न्यायालयात केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी कुत्र्यासारखा दिसतो का?

मोहम्मद सलीम मीरा शेख याने 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यावेळी टाडा न्यायालयाला एक प्रश्न केला, मी तुम्हाला कुत्र्यासारखा दिसतो का? कुत्ता हे नाव अपमानास्पद वाटत असून, न्यायालयाने माझ्या नावापुढील कुत्ता हा टॅग काढून टाकावा, अशी विनंती केली होती. यावर या खटल्याची सुनावणी घेणारे न्यायाधीश पीडी कोडे यांनी प्रत्येक व्यक्तीला घटनेनुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे निरीक्षण नोंदवून "कुत्ता" हा शब्द रेकॉर्डमधून वगळण्याचा आदेश दिला होता.

सलीम कुत्ता याचे मूळ गाव तमिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यातील कुट्टा होते. त्यामुळेदेखील सलीम शेखला "सलीम कुट्टा' नावाने ओळखले जात होते. पुढे त्याचा स्वभाव आणि गावाच्या नावाचा अपभ्रंश सलीम कुत्ता असाच त्याचा उल्लेख केला जात असल्याचेही सांगितले जाते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT