Jayant Patil- Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

Assembly Session : जयंत पाटलांच्या ‘त्या’ शहाणपणाच्या विधानामुळे आरआर आबांचा आत्मा दुःखी होत असेल; मुनगंटीवारांचा पलटवार

सरकारनामा ब्यूरो

Kharghar Incident In Assembly : (स्व.) आर. आर. पाटील यांची आज आठवण येते, ते नशीबवान होते. त्यांना भाग्यशाली विरोधी पक्षनेता होता. ज्याचं त्यांनी कौतुक केले. पण आमचं दुर्दैव आहे, तसा भाग्यशाली विरोधी पक्ष आम्हाला लाभला नाही. अतिशय क्षुद्र राजकारण हे लोक करत आहेत. (स्व.) आर. आर पाटलांचा आत्मा जयंत पाटील यांच्या अशा शहापणाच्या वक्तव्यामुळे निश्चितपणे दुःखी होत असेल, अशा शब्दांत राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर प्रतिहल्ला केला. (Sudhir Mungantiwar's Strongly reply to Jayant Patil)

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमावेळी १६ सेवकांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात शिवसेनेचे गटनेते आमदार अजय चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यावेळी त्यांनी आरआर आबांचा दाखला देत जयंत पाटील (Jayant Patil) यांना सुनावले.

खारघर दुर्घटनेच्या चौकशी समितीला मुदतवाढ न देता त्याबाबतचा अहवान विधानसभेत सादर करावा, अशी मागणी केली होती. त्यावर मुनगंटीवार यांनीही जोरदार प्रतिवाद केला. ते म्हणाले की, चौकशी समितीने मुदतवाढ मागितली हेाती, म्हणून त्यांना मुदतवाढ दिली. मागे अशा काही समित्यांना मदतवाढ देण्यात आल्याची आठवण मुनगंटीवर यांनी करून दिली. गोवरी हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी २६ नोव्हेंबर १९९४ रोजी समिती नेमली होती. त्या समितीने मार्च १९९८ ला अहवाल दिला होता. अशा समितींना अहवाल देताना कालावधी द्यावा लगातो. कारण वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. तसेच, गोवरी हत्याकांडच्या वेळीही शरद पवार यांनी उत्तर दिले होते. मांढरदेव दुर्घटना झाली, त्यावेळी आर. आर. पाटील यांनी उत्तर दिले होते.

आमच्याकडील काही राजकीय पक्ष सत्तेसाठी लालसा ठेवून आहेत. एक रुपयाचीही मदत त्यांनी जखमी अथवा मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना केलेली नाही. पूर्वी सभागृहात लोकहिताच्या सूचना केल्या जायच्या. पण, आता काही लोक शहाणपणा करत शुद्र राजकारण करत आहेत. सभागृहाच्या आयुधाचा वापर करत सत्तेच्या खुर्चीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहेत. अशा लोकांचा महाराष्ट्राचे जनतेने निषेधच केला पाहिजे, अशा कडक शब्दांत मुनगंटीवार यांनी विरोधकांची हजेरी घेतली.

मुनगंटीवार यांना जयंत पाटील यांनी पुन्हा उत्तर दिले. ते म्हणाले की, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उत्तर आम्ही ऐकले. प्रश्न आणि उत्तराचा काय संबंध आहे का?, आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री म्हणून उत्तर दिले होते. गोवारी हत्याकांडासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री या नात्याने उत्तर दिले आहे. (माझ्यानंतर तुम्हाला बोलायची संधी मिळणार आहे, आता तुम्ही खाली बसा. तो शहाणा कोण आहे, हे शोधायला सांगितलेले आहे. ते तुम्ही तुमच्यावर घेऊ नका, असेही पाटील यांना सत्ताधाऱ्यांना सुनावले)

जयंत पाटील काय म्हणाले होते?

खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीन महिन्यांपूर्वी समिती नेमली होती. त्या समितीला १३ जुलै रोजी मुदतवाढ दिली. त्यावेळी १३ ते १४ लोकांचे मृत्यू झाले. कार्यक्रमाचे काय पद्धतीने आणि कुणी आयोजन केले? आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आणि आपुलकी आहे. त्यांच्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही. पण, भरउन्हात साडेसहाशे एकरांवर वीस लाख लोकांना बोलावणे आणि त्यांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागणं. असा हा कोण शहाणा आहे?, ज्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्या शहाण्या व्यक्तीने हा कार्यक्रम घेतला आहे, त्याला याबाबत कारणीभूत ठरवलं पाहिजे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आयोजक आणि सरकारचे वाभाडे काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT