Sushama Andhare On NCP Sharad Pawar
Sushama Andhare On NCP Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sushama Andhare On NCP : 'मी राष्ट्रवादीची सदस्या नव्हते, पण बहुजन-उपेक्षितांची बुज असणारा नेता.." ; अंधारेंचं भावूक पत्र !

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Resigns Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षापदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहेत. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र याबाबत अजूनही शरद पवार हे फेरविचार करतील का? याबाबत चर्चांना उधाण येत आहे. मात्र पक्षातील कार्यकर्त्यांना भरून आले आहे. या सर्व घडामोडींवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भावनिक पत्र लिहले आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अंधारे म्हणतात, "खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्य ही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणुनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही."

सर बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होते ते आज असेलच असे नाही जे आज आहे ते उद्या राहीलच असे नाही पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.

कदाचित आपल्या नंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतील ही पण सर , माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत.

कुणी काहीही म्हटलं तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.

सर, एकीकडे ना धो महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला.

सर, कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतुसूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते. एक नेतृत्व , दोन वक्तृत्व , तीन विचारधारा, चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारता येणार नाही.

शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही. पण आपला अनुभव प्रश्न हाताळण्याचे हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे." असे अंधारे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT