Sushama Andhare, Shrikant Shinde  Sarkarnama
मुंबई

Thackeray Faction News : कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत सुषमा अंधारे यांचे सूचक विधान

Bhagyashree Pradhan

Kalyan Lok Sabha Constituency Politics News :

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी माझे नाव चर्चेत आहे. पण पक्षाकडून कोणताही अधिकृत निरोप मला आलेला नाही. मला फक्त काम करायचं आहे. मुक्त संवाद अभियानाच्या मार्गातून जाताना कल्याण लोकसभा मतदारसंघ देखील लागतो म्हणून मी आज इथे आले. मात्र पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेन. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढवणे हे माझ्यासाठी कठीण नाही, असे वक्तव्य Sushma Andhare यांनी कल्याण पूर्व येथे माध्यमांशी बोलताना केले.

गेल्या 24 दिवसांत लोकसभा क्षेत्रात विविध ठिकाणी लोकांशी संवाद साधत असून अनेक प्रश्न जाणून घेतल्याची माहिती अंधारे यांनी माध्यमांना दिली. उद्या ठाण्यात सभा घेणार असून आज सायंकाळी कल्याण येथे सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'मग 'या' प्रश्नावरही एसआयटी लावा'

मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करायची असेल तर भीमा कोरेगावच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणासाठी ज्यांचे जीव गेले त्यांच्या एसआयटी चौकशीचे काय? समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात जे लोक गेले त्यांच्या एसआयटी चौकशीचे काय? या सगळ्या प्रकरणाची चौकशी सरकारने लावली पाहिजे. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्यावरही टीका केली.

'फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करावा'

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप का केला नाही? ते वक्तव्य करताना कशाला कोणाचा आधार घेत आहेत? असा सवाल त्यांनी केला. त्या सगळ्या घडामोडीत मंगेश चिवटे यांची भूमिका फार महत्त्वाची होती. चिवटे कोणाचा माणूस आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे फडणवीसांना काही आक्षेप असतील तर त्यांनी थेट निशाणा साधावा, असे त्या म्हणाल्या.

'श्रीकांत शिंदेंसाठी निवडणूक सोपी नाही'

कल्याण पूर्वेत कमालीची दहशत, गुन्हेगारी, वाढलेली ठेकेदारी पाहिला मिळते. पोलिस स्वतः दहशतीखाली वावरत आहेत. कमालीची अस्थिरता आणि लोकांची नाराजी आहे. जी लोकांना भेटताना दिसून येते. त्यासंदर्भात लोकांशी संवाद साधण्याचे काम सुरू आहे. भाजपच्या आमदाराने शिंदेच्या प्रमुखाला गोळ्या घालाव्या. याचा अर्थच सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत वाद किती टोकाला पोहचला आहे हे दिसून येते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये येणारी निवडणूक खासदार श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून सोपी वाटते तितकी सोपी ती नक्कीच नसणार, असा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री स्वतःला कितीही शेतकरी पुत्र म्हणत असले तरी श्रीकांत शिंदे हे काही शेतकरी पुत्र नाही. श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भ श्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आहेत, अशी टीका त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा'

दोन दिवसांपूर्वी मलंगगड येथे निष्ठेचा प्रसाद वाटत असलेल्या दोन जणांवर पोलिसांनी कारवाई केली. हे शब्द काही आक्षेपार्ह नाही. त्यामुळे कायद्यानुसार कोणत्याही गुन्ह्याच्या व्याख्येत ते बसत नाहीत. पण तरीही निष्ठावंतांना त्रास देण्यासाठी विविध गुन्हे मुद्दामून दाखल करण्यात येतात. कायद्याचा गैरवापर करण्यात येत आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, त्यांना आक्षेपार्ह शब्द वापरणे हा गुन्हा आहे. करा व्हिडिओ, त्या व्हिडिओचे तुम्ही जास्तीत काय कराल? तुमच्या बायकांना दाखवाल, अशी ही अत्यंत खालच्या पातळीची भाषा नितेश राणे यांनी वापरली. त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचे होते. मात्र पोलिसांचेच हात यांनी बांधून ठेवले आहेत, असा थेट आरोप सुषमा अंधारे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदा सुव्यवस्था राखणे यापेक्षा निष्ठावंतांना त्रास देणे यासाठी गृह खात्याच्या वापर करावासा वाटतो, अशीही टीका त्यांनी केली.

3 तारखेला मातोश्री येथे यात्रेचा समारोप

ठाकरे गटाचे तीर्थ ते शिव तीर्थ या मुक्त यात्रा संवादाचा आजचा 23 वा दिवस आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाडी वस्तीमध्ये आम्ही फिरलो आहोत. 3 तारखेला मातोश्री येथे या यात्रेचा समारोप होणार

'पक्ष बदलला आणि लगेच गुन्हा मागे'

प्रतीक्षा नगर सायन कोळीवाडा येथील ठाकरे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश साटमकर यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर पक्षबदल करत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही, असा एक रिपोर्ट दिल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT