Abhijeet Bangar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

TMC Budget 2024 : ठाणे महापालिकेच्या बजेटवर मुख्यमंत्र्यांची छाप; 'ठाणे बदलतंय' तरीही योजना जुन्याच

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठाणे महापालिकेच्या बजेटमध्ये करवाढ, दरवाढ नसेल, अशी चर्चा होती. आणि तसेच झाले आहे.

Pankaj Rodekar

Thane Municipal Budget 2024 News :

ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी 2024-25 चे बजेट आज (गुरुवार) सादर केले. हे बजेट ठाणेकरांशी संवाद साधून तयार करण्यात आले, असे आयुक्तांनी जरी स्पष्ट केले असले तरी, त्या बजेटवर प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाणे बदललंय ही मुख्यमंत्री शिंदे यांची थीम असली तरी प्रत्यक्षात बजेटमध्ये जुन्याच योजना आहेत. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय दृष्ट्या ठाणेकरांवर कराचा किंवा दराचा बोजा टाकला जाणार नसल्याचे बोलले जात होते. त्याचप्रमाणे यंदाचे बजेट ना करवाढ करणारे ना दरवाढ करणारे आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्याचे 'बदलतंय ठाणे' अभियानानुसारच ठाणे महापालिकेचे (Thane Municipal Corporation) बजेट मांडण्यात आल्याचे दिसत आहे. यामध्ये स्वच्छ ठाणे, स्वच्छ शौचालय, खड्डेमुक्त ठाणे, सुंदर ठाणे, क्लस्टर योजना, हरित ठाणे उपक्रम, तर यंदा धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) स्मारक आणि आनंद आश्रम परिसर सुधारणा, नवे महापौर निवास आदी प्रामुख्याने ठळक मुद्दे मांडण्यात आले आहेत.

याशिवाय शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणावर भर दिल्याचे दाखवले गेले आहे. मात्र आयुक्तांच्या संकल्पनेतील 'चला वाचू या' हा नवा उपक्रम या अर्थसंकल्पात त्यांनी प्रामुख्याने मांडल्याचे दिसत आहे. त्यामध्ये शाळेतील वाचन कोपरा, निसर्ग वाचनालय, मुख्यालयात वाचनालय, ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय, झोपडपट्टी येथे वाचनालय हे मुद्दे मांडले गेले आहेत. त्यासाठी तरतुद करण्यात आलेली आहे.

ठाणे बदलतंय... हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं स्वप्न या बजेटमधून उतरवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. तर बजेटच्या पुस्तकावरही 'ठाणे बदलतंय'चा लोगो वापरण्यात आला आहे. त्यामुळे बजेच महापालिकेचे आहे की मुख्यमंत्र्यांचा अशी चर्चा आता ठाण्यात सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलचे विस्तारीकरण

सुपर स्पेशलिस्ट सुविधा (कॅशलेस) असणारे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय अशी ओळख असलेल्या श्रीनगर, वागळे इस्टेटमधील मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 20 कोटींची तरतूद असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच रुग्णालयाच्या शेजारची जागा संपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

याशिवाय मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल पीपीपीच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्य वर्धिनी केंद्रांची संख्या 100 पर्यंत वाढवण्याचे नियोजन या बजेटमध्ये केले आहे. सध्या महापालिका हद्दीत 46 'आपला दवाखाना' सुरू असून लवकरच आणखी 20 दवाखाने वाढतील, असा अंदाज आयुक्तांनी वर्तवला आहे. एवढीच एक बाळासाहेबांच्या नावाची योजना या बजेटमध्ये दिसत आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT