TMC and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thane Municipal Corporation : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ऐकावं ते नवलच; महापालिका मुख्यालयातून 'ती' महत्त्वाची नोंदवही गायब

Pankaj Rodekar

Thane Political News :

ठाणे महापालिकेतील सातत्याने वेगवेगळ्या फायली गायब होत असताना, आता महापालिका मुख्यालयातून नगरसेवक आवक-जावकची 'नोंदवही' गायब झाल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. तर, सात महिने उलटल्यानंतर ही त्या नोंदवहीचा शोध लागत नसल्याने निर्धारित वेळेत माहिती न मिळाल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे. विशेष म्हणजे एवढी महत्त्वाची नोंदवही महापालिकेतून गायब कशी होऊ शकते, या नोंदवहीची जबाबदारी कुणाची असते, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) मुख्यालयातील रजिस्टर (Register missing) अशाप्रकारे गायब होत असतील तर अधिकारी करतात काय? त्यांची चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

याशिवाय महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार फायली फक्त विभाग प्रमुखांनी नियुक्त केलेल्या लिपिकांकडे सुपूर्द करायच्या असतात. परंतु या कार्यालयातील कर्मचारी हेतुपुरस्सर परिपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही याची काळजी घेत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयातून नगरसेवक आवक-जावक नोंदवहीची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेली होती. तब्बल सात महिने उलटले असतानाही माहितीचा अधिकार कार्यकर्ता तसेच मनसे शाखा संतोष निकम यांना माहिती मिळालीच नाही. त्यानंतर याबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijeet Bangar) यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी त्वरित माहिती देण्याचे निर्देश दिले. तरीही माहितीसाठी अधिकाऱ्यांनी फेऱ्या मारण्यास लावले असल्याचा आरोपही निकम यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याच्या निषेधार्थ निकम यांनी या टाळाटाळी विरोधात थेट कार्यालयाच्या बाहेर अनेक तास जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन केले. तेव्हा माहिती देण्यासाठी आणखीन 15 दिवसांची मुदत मागून घेतली, त्यानंतरही माहिती देण्यात आली नाही.

सात महिन्यांपासून गहाळ रजिस्टरचा शोध पालिकेच्या संबंधित विभागाला लागलेला नाही. या संदर्भात उपायुक्तांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांची भेटही घेतली आणि तासभर चर्चाही केली. त्यानंतर सदर अधिकाऱ्याने माहिती देण्याऐवजी त्यांनी पुन्हा समस्या काय आहेत हे नमूद करून अर्ज सादर करण्यास सांगितले.

ठाणे महापालिका अधिकारीवर्ग हे आयुक्तांना खरी परिस्थिती सांगत नाहीत, लपवाछपवी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT