Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Shivsena : ठाण्याची ठाणेदारी की कल्याणची सुभेदारी! शिंदेंचे घोडे नेमके अडले कुठे ?

Pankaj Rodekar

Thane Political News : ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गड असल्याचे समजले जात आहे. त्यातच ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर शिवसेनेचे खासदार असल्याने शिवसेना शिंदे गट त्या दोन्ही जागांवर निशाण लावून बसले आहे. मात्र भाजपनेही शिंदेंच्या गडात प्रवेश करण्याचा ठाम निश्चय केल्याने ठाण्याची ठाणेदारी की कल्याणची सुभेदारी याचा निर्णय भाजपने शिंदेंवर सोडला आहे. मग, शिंदेंचे घोडे नेमके अडकून पडले कुठे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच भाजपने ठाण्याच्या ठाणेदारी आपल्याकडे राखण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. परिणामी कल्याणच्या सुभेदारीच्या प्रेमात असलेले शिंदे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी खेचून आणलेल्या ठाण्याच्या ठाणेदारीवर पाणी सोडणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकाचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही मित्र पक्षांनी आपापला दावा केलेला आहे. आता मतदारसंघात इच्छुकांची यादी व्हायरल होत आहे. या रेसमधून मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अचानक एक्झिट घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपचा दावाही ओसरू लागला होता. त्यामुळे ठाण्याची ठाणेदारी शिंदे गटाला मिळणार हे निश्चित झाले. तत्पूर्वी कल्याणच्या सुभेदारीवरून भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली होती. पण भाजपने कल्याणच्या सुभेदारीवरील शिंदेंसाठी दावा सोडला.

एकेकाळी ठाणे (Thane) हा भाजपचा बालेकिल्ला होता. त्यामुळे कल्याण नाहीतर ठाणे मिळावे यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले. आणि अचानक पुन्हा भाजपाने ठाण्यावर दावा कायम असल्याचे निशाण फडकवले. दरम्यान शिंदे गटाकडून उमेदवार म्हणून रवींद्र फाटकांचे नाव चालवले जात होते. पण,मध्यंतरी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे ही जागा नेमकी कोणाची हे अद्यापही निश्चित झालेले नाही. त्या जागेवर आमचा दावा आहे. या जागेबाबत दिल्लीत निर्णय होणार असे म्हणून फाटकांचे लोकसभेचे फाटक कायम बंद केले.

दरम्यान, ठाणे की कल्याण (Kalyan) याच्यावर निर्णय होणे बाकी आहे. कल्याणची उमेदवारी ही मोठी असल्याने तिला पसंती असल्याने भाजपला उभारी मिळाली आहे. त्यामुळे आता ठाणे जागेवर दावा सांगत निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये इच्छुकांच्या यादीतील एक नाव आघाडीवर आहे. तसेच संबंधित इच्छुक उमेदवार पंतप्रधान मोदी यांच्या काही खास व्यक्तींमधील आहे. त्यामुळे भाजपने सहस्त्र 'बुद्धीचा' वापर करून आणि विनय धोरण अवलंबून ठाण्याची उमेदवारी पुन्हा एकदा भाजपने मिळविली असेच म्हणावे लागणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामाच्या धडाक्याने शिंदे गटाला कल्याणचा किल्ला सर्वाधिक प्रिय असल्याचे दिसते. त्यामुळे ठाण्यावर पाणी सोडण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT