- शर्मिला वाळुंज
Dombivli News : कल्याण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी राजकीय वर्तुळात मात्र चर्चाच घडवून आणली.
भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या महायुतीच्या नेत्यांसोबत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांची असलेली उपस्थिती युतीचे संकेत देऊन गेली. यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आम्ही तिघे एकत्रच असे जाहीरपणे सागून मनसेचे आमदार राजू पाटील यांना महायुतीत सहभागी करून घेतले. तर लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा असल्याचे चव्हाण यांनी जाहीरपणे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कल्याण तालुक्यातील भंडार्ली, दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, ठाकूरपाडा, नारिवली, निघू आदी भागातील रस्ते कामांसाठी 14.20 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचे भूमिपूजन रविवारी पार पडले. यावेळी भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील एकत्र आले होते. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात चांगल्या प्रकारे विकासकामे होत असल्याचे मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले, राजू पाटील (Raju Patil) यांनी विकासकामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी त्यांनी मानले आहेत. त्यामुळे लोकसभेपर्यंत ते शंभर टक्के महायुती सोबत आहेत. कारण त्यांच्या मनामनामध्ये श्रीरामाचे झालेले भव्य मंदिर आहे. त्यांनी आणि त्यांचे नेते या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पक्षाचा विकासाचा, हिंदुत्वाचा अजेंडा असेल. जर या भागात अतिशय चांगल्या पद्धतीने विकास काम होत असेल तर ते नक्कीच आपल्याबरोबर राहणार यात काही शंका नाही याची मला पूर्ण खात्री आहे असे चव्हाण यांनी सांगितले.
तर श्रीकांत शिंदेंची हॅटट्रिक...
मंत्री चव्हाण बोलताना म्हणाले, आम्ही तिघे एकत्रच आहोत. काही वेळेस वरच्या मंडळींची जी भावना असते त्या भावना स्पष्ट करता येत नसतात. कल्याण लोकसभेमधील असलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आहोत. हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर एकत्रित आहोत. हा मतदारसंघ उजव्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून हॅटट्रिक करून निवडून देणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्री चव्हाण यांच्या सोबत आमचे चांगले संबंध
यावेळी बोलताना मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले, मंत्री चव्हाण यांच्या सोबत आमचे चांगले संबंध आहेत. आम्हाला गावपातळीवर जास्त निधी मिळत नव्हता. एमएमआरडीएच्या माध्यमातून काही काम झाली होती. परंतु जसे रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त आनंद मलाच झाला असेल. कारण माझ्या हक्काचा माणूस त्या मंत्रीपदावर बसला होता. त्यांनी रस्ते तसेच अन्य विकासकामांसाठी भरपूर निधी दिला. आज त्याच कामांचे उद्घाटन होत असल्याचे ते म्हणाले. तसेच आम्ही आधी पासून एकत्र असल्याचे संकेत दिले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.