Mumbai News, 14 Dec : रेल्वेकडून दादर येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर (Dadar Hanuman Temple) पाडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर मंदिराच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला होता.
शिवाय कोणत्याही परिस्थितीत हे मंदिर तोडू देणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. शिवाय यासाठी शनिवारी संध्याकाळी ठाकरे गटाकडून या मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरतीसाठी आदित्य ठाकरे आणि ठाकरेसेनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार होते. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता हिंदूंची मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती.
या प्रकरणावरून राजकारण तापलं असतानाच आता भाजप नेते आमदार मंगल प्रभात लोढा (MLA Mangal Prabhat Lodha) यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती दिली आहे. या मंदिराला आलेल्या नोटीसीची माहिती घेऊन रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून या नोटीसीला स्थगिती दिल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे.
तसंच आता या हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मंदिर पाडण्याची नोटीस स्थगित केल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) या मंदिरात महाआरती केली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती देताना मंगलप्रभात लोढा म्हणाले, "विश्व हिंदू परिषद आणि आमचे सर्व बजरंग दलाचे पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते.
मी पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आल्यानंतर जनरल मॅनेजर आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली. काल आमचं मंडळ रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले होतं. तर आता या नोटीसीवर आता स्टे ऑर्डर काढण्यात आली असून या निर्णयाची स्टे ऑर्डर माझ्याकडे आलेली आहे. शिवाय मंदिराच्या विषयांमध्ये राजकारणाविषयी मी काही बोलू इच्छित नाही.
तर आता इथे स्टे मिळाल्यानंतर कशाला कोणी आरती केली पाहिजे? धार्मिक विषयात राजकारण आणू नये, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. तर या मंदिराला काहीही होणार नाही, ते त्याच ठिकाणी राहणार असून ते कोणीही पाडणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, आज सकाळीच संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपने हे मंदिर तोडून दाखवावं आम्हाला पाहायचे आहे भाजप खरंच हिंदुत्ववादी आहे का? असं म्हणत आव्हान दिलं होतं. शिवाय भाजप सरकार मंदिरांवर बुलडोजर चढवत आहेत. मात्र, बांगलादेशच्या प्रकरणावर शेपूट घालून बसले आहेत. बांगलादेशातील हिंदूच्या अत्याचाराबाबतचा आवाज आम्ही संसदेत उठवण्याचा प्रयत्न केला.
पण भाजपचं सरकार या विषयावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. अशा शब्दात राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. तर राऊतांच्या या आव्हानानंतर आता भाजपने थेट हे मंदिर पाडणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसंच दादर रेल्वे स्थानकातील हनुमान मंदिर हे 80 वर्षापूर्वी एका हमालाने बांधलं आहे. त्यावेळी कोणत्या अडचणी आल्या नाहीत.
तिथलं हनुमान मंदिर हे मजुरांचं आहे. तो मजुरांचा देव आहे. त्यामुळे आज संध्याकाळीॉ तिथे महाआरती आम्ही करणार आहोत. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर भाजपच्या नेत्यांना हिंदू म्हणून या आरतीसाठी यायची इच्छा असेल तर त्यांनी यावं. आम्ही त्यांच्या हातात गदा आणि घंटा देऊ, असंही राऊत म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.