Ajit Pawar - Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis On Ajit Pawar : "...तर अजितदादांना 5 वर्षांसाठीच मुख्यमंत्री बनवू!" ; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Deepak Kulkarni

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांनी काही आमदारांसह थेट सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांना अर्थखात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली. अजित पवारांची मुख्यमंत्रिपदाची इच्छाही लपून राहिलेली नाही.

तसेच लवकरच दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावाही अजित पवार गटातील नेत्यांकडून नेहमी केला जातो, पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाविषयी मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात अजित पवारांचा सत्तेतील सहभाग, २०१९ च्या पहाटेचा शपथविधी, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजितदादांची मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा यांसह विविध मुद्द्यांबाबत रोखठोक भूमिका मांडली.

फडणवीस म्हणाले, सध्या राज्यात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत. राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार नाही आणि अजित पवारांना(Ajit Pawar) मुख्यमंत्री बनवायची वेळ आली, तर त्यांना 5 वर्षांसाठी बनवू”, असं मोठं विधान फडणवीसांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

"...तेव्हा पवार आमच्यासोबत सरकार बनवण्यासाठी तयार होते!"

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर जेव्हा आमच्यासोबत शिवसेनेनं विश्वासघात केला. तेव्हा पवारांनी आमच्यासोबत बातचीत केली. ते सरकार बनवण्यासाठी तयार होते, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.

ते म्हणाले, 2019 च्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडिया ही शरद पवारांची होती. मी इतक्या लवकर भूमिका बदलू शकत नाही. राष्ट्रपती शासन लागल्यावर एनसीपीलाही लेटर देण्यात आलं. हे एनसीपीचं लेटर माझ्या घरात तयार झालं. त्यावर त्यांनी सही केल्याचेही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, आम्हाला संधी मिळाली, आम्ही राजकारण केलं. तुमचा पक्ष का फुटतो? तुम्ही तो फुटू देऊ नका. पण आता अजित पवारांचं पारडं जड आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केस जास्त मजबूत आहे. उद्धव ठाकरे 16 आमदार बाद होतील, अशी अफवा पसरवत आहे.(Chief Minister News)

आज सर्वच विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकत्र येत आहेत. मोदी हे त्यांचं एकमेव लक्ष्य आहे. जर एखाद्या पक्षाला आम्हाला मजबूत करण्यासाठी सोबत यायचं असेल, तर त्यात अडचण असण्याचं काही कारण नाही, असंही फडणवीस म्हणाले.

" भाजपच नंबर वन पार्टी असणार..."

राज्यात मी पुन्हा सरकार आणणार असल्याचा निर्धार व्यक्त करत फडणवीस म्हणाले, भाजपच येत्या निवडणुकीत नंबर वन पार्टी असणार आहे. तसेच पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा दिल्लीत जाईन,मुंबईत थांबेन किंवा नागपूरलाही जाण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. या वेळी त्यांनी केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा या पतंगबाजी असल्याचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. याचवेळी फडणवीसांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. पण सध्या पुण्याचे पालकमंत्रिपद देऊन अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही नाराजी दूर झाली किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT