Eknath Shinde & Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Crisis Vs Shivsena Crisis : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडात काय आहे साम्य आणि वेगळेपण...?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मागील वर्षी शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट अशी दुभंगली गेली. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनेवर दावा ठोकला होता. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या बंडाची हुबेहुब पुनरावृत्ती राज्यात राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा होताना दिसत आहे.

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. या धक्क्यातून सावरण्याआधीच शरद पवारांना दुसरा धक्का बसला आहे. अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बंडाची जोरदार तुलना सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडात नेमकं काय साम्य आणि काय फरक आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्याकडे ५५ आमदारांचं तर ठाकरेंना १६ आमदारांचं समर्थन होतं. आता राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवारांना ४० आमदारांचं पाठबळ असून शरद पवारांकडे १४ आमदार असल्याचा दावा केला जात आहे. तर काही आमदारांनी अद्याप तटस्थ भूमिका घेतली आहे.

व्हिप कुणाचा लागू होणार..?

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंनी त्यांना गटनेते पदावरून दूर केलं होतं. त्यानंतर व्हिप जारी केला. तर एकनाथ गटाकडून भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करतानाच त्यांचा व्हिप लागू करत ठाकरे गटातील आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नंतर शिंदेंनी बहुमताच्या जोरावर शिवसेना पक्षावर दावा ठोकला.

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न...

अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीवर दावा ठोकतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची हकालपट्टी केली होती. तसेच अनिल पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करतानाच त्यांचाच व्हिप लागू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच हा दावा ठोकण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली होती. आता अजित पवारां(Ajit Pawar)च्या बंडानंतर राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न उभा राहिला असून हा संघर्ष आता परत सर्वोच्च न्यायालय आणि केद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याची दाट शक्यता आहे. मात्र,अजित पवारांकडून कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरु असतानाच शरद पवारांनी एकीकडे आम्ही न्यायालयात नाही तर जनतेच्या कोर्टात जाऊ असं सांगितलं आहे.

शिंदे आणि अजितदादांच्या बंडानं काय साधलं...?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. नंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. तर अजित पवारांच्या बंडामुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागला आहे. शिंदे-फडणवीस सरकार अधिक भक्कम झालं.

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अचानक एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडली. आता अजित पवारांच्या बंडामुळे एकाच पंचवार्षिकमध्ये तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शिंदे आणि पवारांच्या बंडात काय फरक...

एकनाथ शिंदें(Eknath Shinde) नी यांनी शिवसेना पक्षावर केलेल्या दाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग, सर्वोच्च अशी कायदेशीर लढाई दिली. अखेर सर्वोच्च न्यायालयानं शिंदेंना फटकारलं खरं काही निर्णय चुकीचे देखील ठरवले. पण यासगळ्यात ठाकरेंनी सहानुभूतपलीकडे फार काही हाती लागलं नाही. तर शरद पवार यांनी बंडखोरांना पक्षातंर्गत कारवाई केली. तसेच कोर्टाच्या दारात न ठोठावता जनतेच्या दारात जाण्याची भूमिका घेतली.

दोन्ही बंडात हे वेगळेपण...

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) बाबतची नाराजी व्यक्त करत 40 आमदारांसह थेट गुवाहाटी, गोवा गाठलं. नंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करत भाजपसोबत सत्तेत आले. तर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत 2 जुलैला शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT