Mumbai News: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप विरोधकांकडून सरकारवर करण्यात येत आहे. (Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar - Morrisbhai Narona Case)
यातच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर येत असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. मात्र, मॉरिसच्या मृत्यूसंदर्भात ठाकरे गटाच्या एका आमदाराने मोठा दावा करत मॉरिसचीही हत्या घडल्याचे सांगितले होते. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही घोसाळकर हत्या प्रकरणात मोठा संशय व्यक्त केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर मॉरिसने स्वतः वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पण मॉरिसने आत्महत्या का केली ? फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या घातल्या. मात्र, गोळ्या कोण घालतंय हे त्यामध्ये दिसत नाही. बॉडीगार्डच्या बंदुकीने त्याने गोळ्या घातल्या असे सांगण्यात येत आहे. पण त्या मॉरिसने बॉडीगार्ड का ठेवला होता ? त्याला बॉडीगार्ड का ठेवावा लागला ? , असे अनेक सवाल उपस्थित करत त्या दोघांची कोणी सुपारी दिली होती का ?" , असा मोठा संशय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याला कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आता मुंबई पोलिस गतीने पावलं उचलत आहे.
काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईच्या दहिसरमधील अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येची घटना घडली. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याच अनुषंगाने आज उद्धव ठाकरे यांनी राज्यात गँगवॉर वाढला असून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणीच केली आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.