Vasai Virar News Sarkarnama
मुंबई

Vasai Virar News : वसईतील 29 गावांकरिता नगरविकास विभागाची अधिसूचना

State Government Notification : वसई-विरार शहर महापालिकेतून 29 गावे वगळण्याच्या याचिकेवर 5 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.

संदीप पंडित

Vasai Virar News : वसई तालुक्यातील 29 गावे वसई-विरार शहर महापालिकेत समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार 30 दिवसांच्या आत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाने पुन्हा एकदा गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना काढल्याने हा गाव बचाव समितीला धक्का मानला जात आहे.अधिसूचना निघाल्याने गावातील नागरिकांच्या भावना मात्र तीव्र झाल्याचे दिसून येत आहेत.

वसई-विरार शहर महापालिकेतून 29 गावे वगळण्याच्या याचिकेवर 5 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय येणार असे वाटत असतानाच नगरविकास खात्याने यावर फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज सादर केला होता. 16 जानेवारीला झालेल्या सुनावणीत नगरविकास खात्याचे सचिव शंकर जाधव यांनी ही गावे पुन्हा महापालिकेत घ्यावीत, असे पत्र न्यायालयाला दिले होते.

त्यामुळे या विषयाला कलाटणी मिळाली होती. यावर पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी रोजी असतानाच या गावांबाबत 14 फेब्रुवारी रोजी नगरविकास खात्याने ही गावे वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट करण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे 29 गावांतील ग्रामस्थांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.

मागील 12 वर्षांपासून गावे वगळण्याबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आश्वासनानुसार 29 गावे वगळली जातील, अशी मोठी आशा येथील पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांना होती. या प्रकरणी तत्काळ सुनावणी घेण्यासाठी शासनाला त्यांनी पत्रही लिहिले होते. मात्र, आता राज्यात सत्तापालट झाल्याने वसईतील 29 गावांचा प्रश्न पुन्हा मागे पडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महापालिकेत समाविष्ट होणारी गावे

प्रभाग समिती ए : आगाशी, कोफराड, वटार, राजोडी

प्रभाग समिती सी : कसराळी, दहिसर कोशिंबे, कणेर

प्रभाग समिती ई : नाळे, वाघोली, निर्मळ, नवाळे, भुईगाव खुर्द, गास

प्रभाग समिती एफ : शिसराड, मांडवी, चांदीप, काशिद-कोपर

प्रभाग समिती जी : चिंचोटी, कोल्ही, कामण, देवदळ, ससूनवघर, बापाणे

प्रभाग समिती आय : कोलार खुर्द, कौलार बुद्रुक, सालोली भुईगाव, गिरीज

======================================

जनआंदोलन समिती आणि काँग्रेस (Congress) नेते डॉमनिक डाबरे म्हणाले, गावे वगळण्याच्या मागणीसाठी आम्ही अनेक आंदोलने केली. मारही खाल्ला. त्यानंतर आतापर्यंत जवळपास 30 हजारांच्या वर हरकती नोंदविल्या होत्या. तरी दरवेळी शासन बदलले की, नव्याने अधी सूचना काढून हरकती मागवल्या जात, ग्रामपंचायतीचे ठराव आणि घेतलेल्या हरकतींना शासनाच्या लेखी काहीच किंमत नाही का? या वेळीही आम्ही हरकतीचा पाऊस पाडू आणि गावे वाचविण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT