Vijay Shivtare .jpg Sarkarnama
मुंबई

Vijay Shivtare : मंत्रिपदासाठी पत्ता कट; आता शिवसेनेच्या विजय शिवतारेंसमोर नवं संकट..? अडचणी वाढणार

Mahayuti Government : आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही,याचं वाईट वाटलं नाही. मात्र, महायुतीतील तीनही नेत्यांकडून ज्याप्रकारची वागणूक देण्यात आली ती चुकीची आहे. हे प्रमुख नेते साधे भेटायलाही तयार नाहीत, त्यांचे आम्ही गुलाम नाही, असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला होता.

Deepak Kulkarni

Mumbai News : महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पाच माजी मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला. यात अब्दुल सत्तार,तानाजी सावंत,दीपक केसरकर,राजेंद्र गावित यांच्यासह विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचा समावेश आहे. यानंतर शिवतारेंनी पक्षाच्या नेतृत्वावर टीकेची झोड उठवली होती. तसेच आता नाही तर कधीच नाही असा कित्ता गिरवत त्यांनी अडीच वर्षांनंतरचं मंत्रिपद मला नको, असा इशाराही त्यांनी दिला. आता याच शिवतारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री आणि शिवसेनेचे (Shivsena) पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या झोपड्या तोडल्याचा गंभीर आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच आंदोलन छेडलं आहे.याचवेळी शिवतारेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली आहे.त्यामुळे आता शिवतारेंसमोर नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण..?

अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात संबंधित जागा ही आमदार विजय शिवतारे यांच्या ताब्यात आहे. पण या ठिकाणी असलेले घरे,झोपड्या जमीनदोस्त करण्यात आली.येथे वास्तव्याला असलेल्या झोपडीधारकांकडून फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.मोबदला न देता फसवणूक केल्याचा झोपडीधारकांचा आरोप आहे.

अंधेरीत विजय शिवतारे बिल्डर हाय हायच्या घोषणांनी दणाणून सोडला. शिवतारे यांनी पदाचा गैरवापर करून गरिबांच्या झोपड्यांवर जेसीबी फिरवल्याचा आरोप केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. पण गरीब झोपडीधारक एमआयडीसी पोलीस ठाण्यात आमदार विजय शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही आहे. एकीकडे मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या शिवतारेंविरोधात झोपडीधारकांनी आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

शिवतारेंचं म्हणणं काय..?

आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही,याचं वाईट वाटलं नाही. मात्र, महायुतीतील तीनही नेत्यांकडून ज्याप्रकारची वागणूक देण्यात आली ती चुकीची आहे. हे प्रमुख नेते साधे भेटायलाही तयार नाहीत, त्यांचे आम्ही गुलाम नाही, असा हल्लाबोल विजय शिवतारेंनी केला होता.

तसेच आपल्याला वैयक्तिक हितासाठी मंत्रिपद नको होतं,तर महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची क्षमता असल्यामुळे ते मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही.याचवेळी त्यांनी दोन दिवस आधी मला मंत्रिपद मिळणार नसल्याची कल्पना दिली असती तर काहीच वाटलं नसतं. माझे सर्व कुटुंबीय आले होते.सोबतच मतदारसंघातील कार्यकर्ते ३०० हून अधिक गाड्या घेऊन नागपूरला आले होते.या सगळ्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता होती.

शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे म्हणाले, अजित पवार यांची आपला मंत्रिपदासाठी पत्ता कट करण्याएवढी ताकद नाही. आणि एकनाथ शिंदे असे कोणाचे ऐकून निर्णय घेत नाहीत, असं विधानही शिवतारे यांनी केलं. यावेळी त्यांनी आपल्या वाईटावर अनेकजण असताना पुरंदरमधून 27 हजारांचं मताधिक्य मिळवून जिंकून आलो, असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT