BJP & Shivsena Dispute  Sarkarnama
मुंबई

BJP & Shivsena : युतीतील वादावर 'असा' पडला पडदा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह खासदार शिंदेंच्या मेगा बैठकीत काय घडलं ?

Shinde - Fadnavis Meeting : महाविकास आघाडीला तडे जाताना दिसतायेत. त्यात आपल्या भांडणाचा...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा युतीत वादाची ठिणगी पडली होती. एकीकडे कल्याण डोंबिवलीच्या वादामुळे खासदार शिंदे अस्वस्थ असतानाच मुख्यमंत्रीही नाराज असल्याचं समोर आलं होतं. तर, दुसरीकडे 'देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात एकनाथ' या जाहिरातीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नाराज असल्याची चर्चा होती. अखेर कल्याण डोंबिवलीसह वर्तमान पत्रातील जाहिरातीवरुन उद्भवलेल्या युतीमधील वादावर आता पडदा पडला आहे.

मागील वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार(Shinde Fadnavis Government) सत्तेत आलं. यानंतर गेले वर्षभर सारं काही सुरळीत सुरु होतं. मात्र, गेल्या काही दिवसांत शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद चव्हाट्यावर आले होते. यावरुन युतीतलं राजकारण चांगलंच तापलं होतं. हीच संधी साधून विरोधकांकडूनही शिवसेना भाजपावर कोंडीत पकडण्याची आयती संधीच मिळाली. या सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी अखेर दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी (दि.१५) बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी मागील काही दिवसांतील वादाच्या मुद्द्यांवर थेट भाष्य करण्यात आलं. फडणवीस- शिंदे यांनी आपआपली जाहिरातींबाबतची भूमिका स्पष्ट केली.

आपण आपल्या सोशल मीडिया आणि इतर टीमवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. जेणेकरुन विरोधकांना संधी मिळणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. दोन्ही पक्षातून कोणताही नेता कोणतेही वक्तव्य करणार नाही, कोणतेही वक्तव्य करण्याआधी दोन्ही नेत्यांची मंजुरी लागेल असंही या बैठकीत ठरलं असल्याचं समोर येत आहे.

युतीतील वादावर तोडगा...?

मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील यावर सकारात्मक भूमिका घेत खासदार श्रीकांत शिंदे यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलावणं धाडलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांच्यात चर्चा झाली. शिवसेनेच्या त्या जाहिरातीमध्ये शिंदे अथवा शिवसेना नेत्यांचा हात नव्हता हे स्पष्ट करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काय घडलं..?

या बैठकीत एकमेकांविरोधी वक्तव्ये दोन्ही पक्षातील नेत्यांनी टाळावेत. जर एखादी भूमिका घ्यायची असेल तर दोन्ही नेत्यांचा ग्रीन सिग्नल हवा. निवडणुकीत कुठेही दगाफटका होणार नाही यासाठी दोन्ही पक्षांनी काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीला तडे जाताना दिसतायेत. त्यात आपल्या भांडणाचा विरोधकांना फायदा होऊ नये अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली. या बैठकीतून शिंदे- फडणवीस या दोन्ही नेत्यांनी घेत युतीतील वादावर पडदा टाकला.

शिंदे- फडणवीस आणि चव्हाण यांच्यात चर्चा...

पालघरमधील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)आणि रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा करण्यात या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या वादावर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी संयमी भूमिका घेत आपण एकत्र आहोत, एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी एकमेकांविरोधात वाद निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचंही म्हटलं.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT