Aaditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरेंच्या भोवतीचं १५ आमदारांचं 'कडं' अधिवेशनात का दिसेना कुठे..?

सरकारनामा ब्यूरो

दीपक कुलकर्णी-

Mumbai : विधीमंडळाचं कुठलंही अधिवेशन असो वा पत्रकार परिषद माजी मंत्री, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंच्या नेहमीच आजूबाजूला ४० ते ५० आमदारांचा गराडा असल्याचे चित्र कायमच पाहायला मिळत होते. विरोधकांवर टीका करताना आक्रमक आणि अभ्यासपूर्ण अशी सांगड घालत ते सभागृह गाजवायचे. त्यांना शिवसेनेच्या आमदारांची भक्कम साथही मिळायची.

आघाडी सरकारच्या काळातील अधिवेशनात विरोधीबाकावर १०५ आमदारांचा भाजप पक्ष आणि देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis )सारखा प्रचंड कोंडी करण्यात माहीर आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असतानाही आदित्य कधी डगमगले नाही. उलट त्यांनी सरकारची आणि त्यांच्या खात्याची भूमिका ठामपणे मांडली. मात्र, हेच आदित्य ठाकरे शिवसेनेतील बंडखोरीनंतर सुरु असलेल्या अधिवेशनात अनेकदा एकहाती किल्ला लढवताना सभागृहात दिसले. कधी आमदार भास्कर जाधव तर कधी अनिल परब, सुनील प्रभू, कैलास पाटील हे त्यांच्या मदतीला आहेत.

युवासेनाप्रमुख आदित्य (Aaditya Thackeray) यांनी २०१९ ला पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. ते ठाकरे घराण्यातील थेट जनतेतून निवडणूक लढवणारे पहिले नेते ठरले. आणि विशेष म्हणजे उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णीही लागली.

आघाडी सरकारच्या कालावधीत पार पडलेल्या पावसाळी, हिवाळी अधिवेशनात त्यांनी विधानसभेचे सभागृह अक्षरश: गाजवले. त्यावेळी त्यांच्या पाठिशी शिवसेनेचे ५६ आमदारांची ताकद होती. नेहमी ५० हून अधिक आमदारांच्या गराड्यात विधानसभा दणाणून सोडणारे आदित्य ठाकरे आता एकाकी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मागील वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)च्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. शिंदेंनी भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना नाव व पक्षही शिंदे गटाला मिळाले. तसेच अनेक बडे नेते, पदाधिकारीही ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाची वाट धरली.

आता एकीकडे सत्ताधारी बाकावर शिवसेने(शिंदे गट)चे ४० हून अधिकहून आमदार(MLA) आहेत तर आदित्य ठाकरेंना मोजक्याच शिलेदारांसह विधानसभेत किल्ला लढवण्याची वेळ आली आहे. त्यात जे सोबत आहेत त्यापैकीही काही आमदार अधिवेशनाला दांडी मारत असल्यामुळे त्यांच्या भोवताली बसलेल्या आमदारांची संख्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही बंडखोरी उफाळून आल्यानंतर महाविकास आघाडीची ताकदही क्षीण झाली आहे. तर सत्ताधारी शिंदे फडणवीस पवार सरकारचं बळ चांगलंच वाढलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभेच्या सभागृहात धडाक्यात एन्ट्री घेणारे, पत्रकारांना थेट सामोरे सभागृहात विरोधकांच्या टीकेला जशास तसे व अभ्यासपूर्ण उत्तर देणारे ठाकरेंचा आक्रमक बाणा कायम राहिला आहे. पण नेहमी ४० ते ५० आमदारांच्या गराड्यात वावरणारे ठाकरे आता ठराविक आमदारांसह तर कधी एकटेच सभागृहात आल्याचे पाहायला मिळाले. तर कधी उरल्या-सुरल्या आमदारांपैकीही मोजक्याच नेत्यांसह पत्रकारांना सामोरे जात असल्याचं चित्र पाहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT