Mumbai : मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी थेट देवेंद्र फडणवीसांना माध्यमांपुढे येऊन खुलासा करण्याची वेळ आणली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या दावा खोडून काढत मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे हेच कायम राहणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले. शिंदे हेच मुख्यमंत्री असतील यावर,उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली होती.
त्यामुळे आता बदलाची चर्चा पतंगबाजी असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. पुढच्या निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वात होतील हेही पुन्हा एकदा सांगून फडणवीस मोकळे झाले. या निमित्ताने का होईना आता मुख्यमंत्रीपदावरून शिंदे जाणार आणि अजित पवार येणार या चर्चेला फडणवीसांनी कोलदांडा घातला आहे.
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर थेट भाष्य केले. फडणवीस म्हणाले,कुठल्याही पक्षातील नेत्यांना आपले नेते मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे. यात वावगं काही नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटू शकतं, आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. भाजपच्या लोकांना आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटू शकतं. शिवेसेनेचे मुख्यमंत्री आहेत. पण मी या महायुतीमधील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की, या महायुतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहणार आहे. दुसरे कुणीही मुख्यमंत्री होणार नाही असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री(Chief Minister Change)पदात कुठलाही बदल होणार नाही. या संदर्भात मी आणि अजित पवार यांच्यात सप्ष्टता आहे की, महायुतीची चर्चा झाली त्यावेळी अजितदादांना याची स्पष्ट कल्पना दिल्या आहेत की, आपल्या युतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहणार आहे. केवळ स्वीकारले नाही तर आपल्या भाषणात सांगितले देखील आहे, मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही बदल होणार नाही.
महायुतीतील लोकं अशी काही वक्तव्य करताहेत माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की, अशा कुठलेही प्रकारचे मिश्र संकेत देणे योग्य नाही. किंवा संभ्रम निर्माण करणे त्यांनी तात्काळ बंद केले पाहिजे. कारण यातून महायुतीच्या संदर्भात संभ्रम निर्माण होत आहे. नेत्यांच्या मनात संभ्रम नाही, एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत.
अनेक लोक पतंगबाजी करताहेत. पण स्पष्टपणे सांगतो नऊ, दहा, अकरा तारखेला काहीही होणार नाही. झालंच काही तर मंत्रिमंडळ विस्तारच होईल. त्याची तारीख ठरायची आहे. मुख्यमंत्री शिंदे ठरवतील त्या तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं फडणवीस म्हणाले. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते..?
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र ठरवतील आणि पक्षांतराबाबत जेव्हा निर्णय़ देतील जो १० आँगस्टपर्यत येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचं निलंबन होईल. यानंतर जे मुख्यमंत्री पद रिक्त केले जाईल तिथे काही व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे.
कदाचित त्याआधीही हा निर्णय होऊ शकतो असं माझं आकलन आहे. मुख्यमंत्रिपद रिक्त झाल्यावर अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री केलं जाईल. कारण महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची भाजपला गरज आहे असा दावा केला होता. यानंतर अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री केलं जाईल असा खळबळजनक दावा करत चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.