Abu Azmai  Sarakarnama
नगर

Abu Azami : सरकारला वाद वाढवायचाय; अबू आझमी आरोप करत वादाच्या स्थळी न येता फिरले मागे

Pradeep Pendhare

Abu Azami : गुहा (ता. राहुरी) येथे धार्मिक स्थळी झालेल्या वादाच्या ठिकाणी येण्यास निघालेले समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी हे माघारी फिरले. संगमनेर येथे पत्रकार परिषद घेऊन ते छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) रवाना झाले. अबू आझमी मागे फिरल्याने तणावाची परिस्थिती निवळल्याने बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरलेले पोलीस मागे फिरले आहेत. परंतु गुहा येथे पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

गुहा येथील धार्मिक स्थळी दोन समाजांच्या व्यक्ती येऊन त्यांच्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रम घेतात. या धार्मिक स्थळाच्या जमिनीचा वाद देखील आहे. तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. यातून दोन समाजांत धार्मिक तेढ असून याला काही जणाकडून खतपाणी घातले जात आहे. यात या धार्मिक स्थळी काही दिवसांपूर्वी दोन गटात वाद झाला. येथील हाणामारीचे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत. यावरून समाजातील दोन गट समोरासमोर येत असून, यातून संवेदनशील परिस्थिती निर्माण होत आहे. यातच या धार्मिक स्थळाला रविवारी आमदार आबू आझमी भेट देण्यासाठी निघाले होते. त्यामुळे परिस्थिती आणखीच तणावाची झाली होती.

अबू आझमी गुहा (ता. राहुरी) येत असल्याने धार्मिक स्थळाभोवती शेकडो तरुण रस्त्यावर उतरले होते. अबू आझमी परत जा, असे फलक झळकवले गेले. तरुणांचा जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांना परिस्थिती हाताळणे अवघड होऊन बसले होते. अबू आझमी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले होते. ते गुहाकडे निघणार असे संदेश येत होते. तसे गुहा येथे जमलेले तरुण आक्रमक होत होते. यातून पोलिसांशी वाद होत होते. राहुरी आणि संगमनेर पोलिसांनी अबू आझमी यांना परत फिरण्याची विनंती केली. धार्मिक स्थळी झालेल्या वादावर पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. यानंतर अबू आझमी यांनी संगमनेर येथेच पत्रकार परिषद घेतली.

अबू आझमी म्हणाले, "देशातील परिस्थिती 2014 मध्ये बदलली आहे. मंदिर-मस्जिद, हिंदू-मुस्लिम असे वाद सुरू आहेत. हे वाद सरकारला संपवायचे नाहीत, तर वाढवायचे आहेत. सत्ताधारी हे वाद राजकीय फायद्यासाठी वाढवत आहेत. गुहा ( ता. राहुरी) येथील धार्मिक स्थळावर ज्यांनी ताबा घेतला आहे, त्यातून हे धार्मिक स्थळ मुक्त झाले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची याबाबत भेट घेऊन चर्चा करणार आहे. या धार्मिक स्थळाची वक्फ बोर्डाकडे नोंदणी आहे. या जागेबाबतचा तिथे वाद सुरू आहे. तिथे हा खटला सुरू आहे, तो राहू द्या. कोणीही जातीय तेढ तिथे निर्माण होईल, असे प्रकार करू नयेत. कोणत्याही मारहाणीचे समर्थन करणार नाही. मुस्लिम समाजाला आवाहन आहे की, हा प्रकार शांततेने सोडवा. धार्मिक स्थळात ज्या परंपरा सुरू आहेत, त्या अबाधित राहू द्या. मात्र, सरकारला या परंपरा नको आहेत. हे दोन्ही समाजाने येथे लक्षात घेतले पाहिजे". अशी मागणी आझमी यांनी केली.

गुहा येथे मी केल्यावर वातावरण अधिकच खराब होईल. सरकारमध्ये आमचा हिस्सा कमी त्यामुळे आमच्याभोवती भीतीचे वातावरण अधिक आहे. मंत्री विखे आणि सरकारला सांगणे आहे की, सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. आमच्या जागा खाली करा. आमच्या अल्पसंख्याकांची परिस्थिती बदलला. गुहा घटनेतील निर्दोषांवर कारवाई करू नका, अशी मागणी अबू आझमी यांनी केली.

काॅंग्रेस-राष्ट्रवादीने दिलेले आरक्षण भाजपने काढून घेतले

देशात हिंदू-मुस्लिम वादामुळे संघर्षाची स्थिती आहे. सरकारमधील काही नेते विखारी बोलतात. सरकारमध्ये बसलेले सर्व हिंदू-मुस्लिम असा वाद घालत आहे. 'ज्ञानव्यापी'चा घटनाक्रम त्याचे उत्तम उदाहरण आहे. अल्पसंख्याकांचे देशात ऐकले जात नाही. आमच्यावर तीनशे ते चारशे कोटीचे बजेट आहे. तो देखील खर्च होत नाही. मुस्लिमांना काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात आरक्षण मिळाले. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर ते गेले. मराठा, ओबीसी समाजाला आरक्षणासाठी आमचा पाठिंबा आहे. तरी आम्हाला पाच टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, असेही अबू आझमी यांनी म्हटले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT