Chhagan Bhujbal  Sarkarnama
नाशिक

Chhagan Bhujbal Politics: भुजबळही रामलल्लाच्या प्रेमात; चौदाशे मतदारांना घडवणार अयोध्यावारी!

Sampat Devgire

Chhagan Bhujbal Politics : भारतीय जनता पक्षाची सलगी केलेल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आता अयोध्येची वाट धरली आहे. आपला येवला आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघातील सुमारे दीड हजार जणांना ते अयोध्यावारी घडविणार आहेत. आमदार कांदे यांच्या मतदारसंघातील मतदारांनाही अयोध्या दौरा घडविणार आहेत.

विशेष म्हणजे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्याशी भुजबळ यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गेले काही दिवस या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली होती. आता मात्र आमदार कांदे यांच्या मतदारसंघातील मतदारांनाही छगन भुजबळ यांनी अयोध्येला रामलल्लांच्या दर्शनासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय वादाचा विषय होऊ शकेल.

मंत्री भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या ‘प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास’ या संकल्पनेतून येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी 'पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेस'ची व्यवस्था करण्यात आली आहे. या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुमारे १४ वर्षांहून अधिक काळ प्रभू रामचंद्राचे या नगरीत वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे, यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना 'पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेस'ची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे २२ डब्यांची 'पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेस' ही ६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ८.१० वाजता मनमाड स्थानकातून अयोध्याकडे प्रयाण करेल. त्यानंतर ७ मार्च २०२४ रोजी रात्री ९.३० वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहाेचणार आहे, तर ८ मार्च २०२४ रोजी दुपारी ४.४० वाजता अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून ९ मार्च २०२४ रोजी रात्री ८ मनमाड येथे पोहाेचणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रवासामध्ये जेवण, नाश्ता, चहा यासह निवासाची व दर्शनाची सुविधा असणार आहे. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहेत. या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख २२ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT