Nashik Political News : खोसकरसाहेब शपथेवर सांगा की तुम्ही काँग्रेस सोडणार नाही ना, असा जाहीर प्रश्न शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी आमदार हिरामण खोसकर यांना केला.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपत असताना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आपल्या स्वभावानुसार हसतच खोसकर यांनी सुहास कांदेंना उत्तरही दिले. दरम्यान, या प्रश्नाची चर्चा मात्र जिल्ह्यात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) अचानक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजित जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपती घेण्याचा प्रयत्न पालकमंत्री दादा भुसे यांनी केला. मात्र, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाणीपुरवठा, सौरऊर्जा, शाळांची स्थिती आदी मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरले. एकीकडे आमदार आपापल्या मागण्या मांडत असताना पालकमंत्री ही बैठक पार लांबू नये, यासाठी प्रयत्नशील होते. समोर आलेल्या मुद्द्यांवर १२ जानेवारीनंतर बैठका आयोजिण्याचे आदेश भुसे यांनी दिले आहेत.
दरम्यान, बैठकीच्या शेवटच्या क्षणी अचानक आमदारांनी प्रश्नांची एकच सरबत्ती केली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी सर्वांना शांत बसवले. प्रश्न विचारण्यासाठी इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर सतत हात वर करीत होते. मात्र, दादा भुसे यांनी लक्ष दिले नाही. परिणामी, मी विरोधात आहे, म्हणून मला बोलू दिले गेले नाही का, असा प्रश्नच खोसकरांनी उपस्थित केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावर दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडून उत्तर अपेक्षित असतानाच समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे आमदार कांदे यांनी जाहीर खोसकरांना बोचरा प्रश्न केला. 'खोसकरसाहेब तुम्ही शपथेवर सांगा की काँग्रेस पक्षाला सोडणार नाही ना? आम्ही तुम्हाला बोलण्याची नक्की संधी देऊ,' कांदे यांच्या या समयसूचक प्रश्नाने उपस्थितांमध्ये एकच हास्य फुटले.
हिरामण खोसकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. त्यातच ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे. जिल्ह्यातील राजकारणात त्यांचे सर्वच पक्षांच्या नेत्यांशी मधुर संबंध आहेत. असे असले तरी, सुहास कांदे यांच्या सहज उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये आगामी काळातील बदलाची नांदी दडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.