M. K. Madhavi Sarkarnama
नवी मुंबई

'शिंदे गटात या नाहीतर एन्काऊंटर..' आरोप करणाऱ्या शिवसेना नेत्यावर तडीपारीची कारवाई!

Shivsena : शिंदे गटात सामील व्हा नाहीतर तडीपार करून एन्काऊंटर करू, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा.

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सत्तासंघर्ष सुरू असताना, पक्ष आणि चिन्हाबाबत लढाई सुरू असताना ठाकरेंच्या बाजून असणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. या आधी शिवसेना समर्थक विजय साळवींवर तडीपारीची कारवाई झाली होती. आता शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना नवी मुंबई पोलिसांनी तडीपार केले आहे. मुंबई शहर, उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यातून त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे नवी मुंबईत शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच एम के मढवी यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. शिंदे गटात सामील व्हा अन्यथा तुम्हाला तडीपार करून एन्काऊंटर करू, अशी धमकी पोलीस उपायुक्तानी दिल्याचा त्यांनी आरोप केला होता. यामुळे एकच खळबळ माजली होती. मात्र एम के मढवी यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे विजय साळवींवरही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती. महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये अनेक गुन्हे आपल्यावर दाखल आहेत. परिसरातील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊन, त्यांच्यामध्ये तुमच्याकडून भीतीचे वातावरण पसरले आहे. तुमच्या गुन्हेगारी दहशतीमुळे नागरिक आपल्या विरुद्ध तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. कायदा सुव्यवस्थेचा सांभाळण्यासाठी आणि तुम्हाला गु्न्हेगारी वृत्तीपासून दूर करण्यासाठी ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येत आहे, असं सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश माने पाटील यांच्याकडून साळवींना बजवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले होते.

मात्र सत्ताधाऱ्याकडून शिवसेनेवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे, असे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून बोलले जात आहे. शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनतेत चीड व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेवर असे कितीही आघात केले तरी शिवसेना मागे हटणार नाही. शिवसैनिक जिद्दीने पेटून उठला आहे. याच जिद्दीच्या जोरावर शिवसेना आगामी निवडणूका जिंकणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT