Akola Zilla Parishad  Sarkarnama
प्रशासन

Akola Zilla Parishad News : ग्रामसेविकेची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह 'BDO'विरुद्ध विनयभंगाची तक्रार!

Akola Zilla Parishad Crime News : विशाखा समिती करणार चौकशी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

योगेश फरपट

Gramsevaka complains of molestation : वंचित बहुजन आघाडीची सत्ता असलेली अकोला जिल्हा परिषद या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक सत्ताधाऱ्यांचा नसल्याने बेताल कारभार पहायला मिळत आहे.

यात एका ग्रामसेविकेने चक्क उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली.

हे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी व जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढावू यांच्या दालनात पोहोचल्यानंतरही दोन्ही महिलांनी आपल्याला ठीक आहे असे म्हणून दाद दिली नसल्याची खंत तक्रारकर्त्या महिलेने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अकोला जिल्हा परिषदेत कार्यरत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अकोटचे गटविकास अधिकारी कालीदास रघुनाथ तापी व अकोल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी व सध्या कार्यरत असलेले लिंबाजी बारगीरे (गटविकास अधिकारी रा. कळमपुरी, जि. हिंगोली) यांच्यावर एका ग्रामसेविकेने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी माझ्या कामाच्या ठिकाणी लैंगीक छळ केला असून, माझे जगणे खूप लाजीरवाने केलेले आहे असा आरोप केला आहे. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करून कामाच्या ठिकाणी माझा होणारा लैगीक छळ थांबवावा व त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सदर ग्रामसेवक महिलेने केली आहे.

विशाखा समिती करणार चौकशी -

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे ग्रामसेवक महिलेने धाव घेत आपबिती सांगितली. यावेळी जिल्हा परिषेदचे माजी पदाधिकारी राजीव बोचे उपस्थित होते. तर, घटनेतील एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असून तापी यांच्यावर अद्याप पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आपण चौकशी करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी तापी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामसेविकेने केली. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवले असून चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

माझ्या जिवीतास धोका - कालिदास तापी

आपली बाजू मांडताना तापी म्हणाले, 'बुधवारी 19 जून रोजी सकाळी 11 ते 11.30 या कालावधीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, अकोला मनोज जाधव यांच्यासोबत कार्यालयातील कामाविषयक चर्चा करीत असतांना त्या ठिकाणी सदर ग्रामसेविका तीन व्यक्तींना घेवून आल्या. तिथे आल्यावर त्यांनी माझा हात पकडून मला मारण्याचा प्रयत्न केला. मी गट विकास अधिकारी, पंचायत समिती अकोला या पदावर कार्यरत असतांना ग्रामसेविकेबाबत सेवा विषयक अनेक तक्रारी कार्यालयास प्राप्त होत्या.

तसेच 'त्यांनी ग्राम चिखलगांव येथे कार्यरत असतांना अफरातफर केल्याने त्यांना प्रशासनाने निलंबीत केले होते. त्यांची खाते चौकशी अंतिम टप्यात असून यात माझी सरकारी साक्षीदार म्हणुन 26 जून रोजी साक्ष आहे. सद्यस्थीतीत माझ्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जिल्हा परिषद, अकोला व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) या दोन्ही पदाचा अतिरिक्त प्रभार असल्याने त्या कार्यवाहीच्या भीतीने माझेवर दबाव आणत आहेत. त्यांनी यापुर्वीसुध्दा माझ्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे.'

याशिवाय 'सदर महिला व तिच्या साथीदारापासून माझ्या जिवीतास धोका आहे. यासंदर्भात मी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस संरक्षण मागितले आहे. असं अकोला जिल्हापरिषदेचे गट विकास अधिकारी तथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य/पंचायत) के.आर.तापी यांनी सांगितलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT