Maharashtra Police Sarkarnama
प्रशासन

Maharashtra Police : पोलिसांना मोठा दिलासा; अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीचा निर्णय पुन्हा जारी

Ganesh Thombare

Mumbai News : महाराष्ट्रातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षकांपर्यंत 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. या निर्णयामुळे राज्याच्या पोलिस दलातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच पोलिसांच्या रजा रोखीकरण सवलती रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. (Maharashtra Police)

यानंतर अखेर राज्य सरकारने हा निर्णय रद्द करत पोलिस दलातील अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीचा निर्णय पुन्हा जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील पोलिसांना 15 दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत दिली जात होती. मात्र, 21 फेब्रुवारीला राज्य सरकारने निर्णय जारी करत ही सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे पोलिस दलातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर पोलिस बाॅइज संघटनेकडून ही सवलत कायम ठेवण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र देण्यात आले होते. या पत्राच्या माध्यमातून पोलिसांना 15 दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत पुन्हा देण्याची विनंती करण्यात आली होती. अखेर पोलिसांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने हा शासन निर्णय रद्द करत पोलिसांना अर्जित रजा रोखीकरणाची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पोलिस दलातील अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीचा निर्णय पुन्हा जारी करण्यात आल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळणार आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, पुष्पवृष्टीवर बंधनं

पोलिस दलातील बदली झालेल्या पोलिस अधिकारी यांच्या सन्मानार्थ विविध पोलिस ठाणे किंवा शाखांमध्ये निरोप समारंभ आयोजित केले जातात. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर निरोप समारंभाचा कार्यक्रम करत त्यांना फेटे बांधून जीपमधून त्यांची मिरवणूक अनेकदा काढली जात होती. मात्र, यापुढे आता या गोष्टी करता येणार नाहीत. याबाबत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी एक परिपत्रक जारी करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टी करणे, अशा गोष्टींवर बंधने येणार आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT