meera bahiendar, vase virar police commissioner sarkarnama
प्रशासन

Best police commissioner: मिरा भाईंदरच्या आयुक्तांनी करुन दाखवलं! नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या केल्या जाणाऱ्या 'खाकी वर्दी'ला मिळवून दिली 'शाबासकी'

Mira‑Bhayandar police News : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र त्यामध्ये बदल झाला असून, पोलिस स्थानकांचा चेहरामोहरा बदलताना कारभारामध्येही आमूलाग्र सुधारणा करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

- प्रकाश लिमये

Mumbai News : राज्यातील सर्वोत्तम पोलिस आयुक्त म्हणून मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तांची निवड करण्यात आली. या काळात कार्यक्षेत्रातील पोलिस स्थानकांचा चेहरामोहरा बदलतानाच, कार्यपद्धतीमध्येही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्योजकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले.

एखादे पोलिस स्थानक म्हटले की एक ठोकळेबाज चित्र डोळ्यासमोर येते. स्थानकाच्या परिसरातच भंगार वाहनांची अडगळ. आत प्रवेश केल्यानंतर भिंतींवरची जळमटं आणि टेबलांवरील फायलींचे ढीग सर्वांत आधी लक्ष वेधून घेतात. आपली तक्रार नेमकी मांडायची कुठे आणि त्याचा फायदा होणार का, असे अनेक प्रश्न आत येणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये असतात. पण, या परिस्थितीमध्ये त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचारच जास्त येत असतात.

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र त्यामध्ये बदल झाला असून, पोलिस स्थानकांचा चेहरामोहरा बदलताना कारभारामध्येही आमूलाग्र सुधारणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक गुंतवणुकीला प्रोत्साहनासाठी पुढाकार यांसारखी पावले उचलण्यात आली. त्यामुळे, या आयुक्तालयाच्या क्षेत्रातील पोलिसांच्या कामावर परिणाम होतानाच नागरिकांच्या मनामध्येही पोलिसांची प्रतिमा बदलण्यास मदत होऊ लागली आहे. त्यामुळेच, राज्य सरकारने सर्वोत्तम पोलिस आयुक्त म्हणून गौरव केला आहे.

कार्यालयीन कामकाजात सुधारणा आणून नागरिकांचे जीवन सुकर करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांना १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम दिला होता. त्यानुसार कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना गुणांकन देण्याची प्रक्रिया विविध स्तरावर आखून देण्यात आली होती. त्यात राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालयांमध्ये मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने सर्वाधिक गुण मिळवित अव्वल क्रमांक पटकावला आहे. हे मूल्यांकन ‘क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया’ यांच्याकडून करण्यात आले.

कामकाजात बदल

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कार्यक्रमांतर्गत संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, कार्यालयीन सोयीसुविधा, ई-ऑफीस व ई-बीट कार्यप्रणाली, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, नावीण्यपूर्ण उपक्रम या मुद्द्यांवर गुणांकन पद्धत आधारीत होती. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने या सर्वच मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित करून आपल्या कामकाजात बदल घडवून आणले. त्यात प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पोलिस ठाण्याची स्वच्छता, त्यात नागरिकांसाठी अधिकाधिक सोयी सुविधा, पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी क्यूआर कोड पद्धत आदींवर विशेष भर देण्यात आला.

त्याचा परिणाम म्हणून पोलिस ठाण्याचे रुप पालटले, एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे स्वरूप पोलिस ठाण्यांना आल्याने नागरिकांना हा बदल सुखावह वाटू लागला आहे, त्यांच्यात पोलिस ठाण्यांबद्दलचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पोलिसांच्या कामात पारदर्शकता वाढलीच; तसेच नागरिकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांनुसार कामकाजात बदलही घडवून आणता आले. याची दखल घेण्यात आल्याने आयुक्तालयाला 100 पैकी 84.57 गुण पटकावता आले.

‘पारंपरिक’ चित्र बदलले

पोलिस स्थानकांचे ‘पारंपरिक’ चित्र बदलण्याचा प्रयत्न आयुक्तालयाकडून करण्यात आला. पोलिस ठाण्यांची रंगरंगोटी करण्यात आली, आवारातील भंगार व पडिक वाहनांचा लिलाव करुन परिसर मोकळा करण्यात आला व त्याठिकाणी फुलझाडे व कुंड्या लावून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. जुन्या नको असलेल्या कागदपत्रांची विल्हेवाट लावण्यात आली व आवश्यक कागदपत्रांची सुसंगतवार मांडणी करण्यात आली. शिवाय तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था, त्यांची आस्थेने चौकशी, पिण्याचे स्वच्छ पाणी; तसेच नीटनेटकी स्वच्छतागृहे यामुळे पोलिस ठाण्यात येत असलेल्या नागरिकांची नकारात्मक मानसिकता बदलून त्यांच्यात सकारात्मक दृष्टी निर्माण होण्यास मदत होत आहे.

तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या नागरिकांना नेमके कुठे तक्रार नोंदवायची, याची माहिती नसते ही अडचण दूर करण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये दिशादर्शक व नामफलक बसविण्यात आले आहेत. आपले म्हणणेच ऐकू घेतले जात नाही, त्यांची तक्रार नोंदवली जात नाही अथवा उडवाउडवीची उत्तरे मिळतात अशी अनेकदा पोलिस ठाण्यांबद्दल नागरिकांची तक्रार असते. हे चित्र बदलण्यासाठी पोलीस ठाण्यांच्या दर्शनी भागातच क्यूआर कोड प्रणाली बसविण्यात आली आहे. ही प्रणाली मोबाइलमध्ये स्कॅन केली की एक प्रश्नावली येते. त्यात तक्रार नोंदविण्यात आली का, अधिकारी व कर्मचार्यांकचा प्रतिसाद कसा होता, त्यांची वागणूक कशी होती यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे भरून नागरिकांनी त्यांना आलेला अनुभव त्यात नोंदवायचा आहे.

उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक हजाराहून अधिक नागरिकांनी आपला प्रतिसाद नोंदवला असून, त्यातील 90 टक्के नागरिकांनी पंचतारांकित रेटिंग देत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उर्वरित दहा टक्के प्रतिक्रियांमध्ये नागरिकांनी सुचवलेल्या सूचना व तक्रारी यांची दखल घेऊन त्याची पडताळणी करण्यात आली व कामकाजात योग्य तो बदल करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. यामुळे आपल्या प्रतिक्रियांची नोंद घेतली जात असल्याचे समाधान सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

अद्ययावत संकेतस्थळ

आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध असते. हे संकेतस्थळ नागरिकांना वापरण्यास सुलभ होईल या पद्धतीने अद्ययावत करण्यात आले आहे. त्यावर माहिती अधिकार अधिनियमांतर्गत देण्यात आलेली माहिती उपलब्ध करण्यात आली आहे तसेच लोकसेवा अधिनियमांतर्गत पोलिस विभागाकडून देण्यात येत असलेल्या सेवाही प्रसारित करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरुन नागरिकांना त्याची माहिती मिळेल. या संकेतस्थळाचे सायबर ऑडिटही करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ एकमधील सर्व पोलिस ठाणे व कार्यालये यांना आयएसओ व स्मार्ट प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत.

नागरिकांना विविध प्रकरच्या गुन्ह्यांच्या प्रकारांची माहिती व्हावी, त्यांनी काय सावधगिरी बाळगावी यासाठी आयुक्तालयाकडून विविध उपक्रम, जनजागृतीपर कार्यक्रम केले जातात, एखाद्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल महत्त्वाचे संदेशही प्रसारित केले जातात. आता हे सर्व उपक्रम, कार्यक्रम; तसेच संदेश एकाच व्यासपीठावर पाहाता यावेत यासाठी आयुक्तालयाकडून व्हॉट्सअॅप चॅनल सुरू करण्यात आले आहे आणि ते ब्लू टीक प्राप्त आहे. शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्याला अत्याधुनिक संगणक नव्याने उपलब्ध आले आहेत. त्यामुळे कामकाजात गती येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाची मदत

आयुक्तालयाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सुरू करण्यात आला आहे. सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांची सेवाविषयक संपूर्ण माहिती एकत्रित करण्यासाठी वर्क फोर्स नावाचे अॅप विकसित करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांचे काम अधिक पारदर्शक व वेगवान होण्यासाठी त्यांना शरीरावर लावण्यासाठी बॉडी वॉन कॅमेरे देण्यात आले आहेत. हे सर्व कॅमेरे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. जेणेकरून वाहतूक पोलिस कर्मचारी व नागरिक यांच्यातील संवाद नियंत्रण कक्षाला पाहता येतो, महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करता येते, एखाद्या वाहतूक पोलिसाला सूचना करता येते. त्याचप्रमाणे एखाद्या आपत्कालीन घटनेत पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी रवानाही करता येते.

आयुक्तालयातील सर्व कार्यालयांमध्ये कागदरहित कामकाज करण्याच्या दृष्टीने १०० टक्के ई-ऑफिस कार्यप्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट ई-बीट हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे सर्व पोलिस ठाण्यांतील बीटमार्शल यांनी एखाद्या ठिकाणी दिलेली भेट व वेळ याबाबत पर्यवेक्षण करणे सुलभ झाले आहे. याव्यतिरिक्त वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापरही सुरू करण्यात आला आहे.

‘फॉरेन्सिक’चे प्रशिक्षण

एखाद्या गंभीर गुन्ह्यात घटनस्थळावरून तातडीने फॉरेन्सिक पुरावे गोळा करणे महत्त्वाचे असते. मात्र पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने आतापर्यंत हे पुरावे गोळा करण्यासाठी ठाणे अथवा मुंबईतून फॉरेन्सिक पथक पाचारण करावे लागत असे. नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेनुसार सात वर्षांवरील शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळावर फॉरिन्सिक पथक अथवा वाहन उपस्थित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने आय बाईक खरेदी केल्या आहेत. आयुक्तलयाच्या तिन्ही परिमंडळांत या बाइक उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बाइकवर फॉरेन्सिक पुरावे गोळा करणारे संच बसविण्यात आले असून हे पुरावे गोळा करणारे प्रशिक्षित कर्मचारी बाईकसोबत असणार आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर हे प्रशिक्षित कर्मचारी तातडीने फॉरेन्सिक पुरावे गोळा करून संबंधित पोलिस ठाण्यात जमा करणार आहे.

याव्यतिरिक्त औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी आयुक्तालयाकडून स्थानिक पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांच्या मदतीने नियमितपणे उद्योजकांच्या बैठका घेण्यात येतात. या बैठकांमध्ये उद्योजकांच्या समस्या त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जातात व त्यांचे निराकारण करण्याचेही प्रयत्न केले जातात. तसेच, गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्योजकांनी काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचेही मार्गदर्शन त्यांना केले जाते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखून दिलेल्या सात कलमी कार्यकमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांचे जीवन सुकर करण्याच्या दृष्टीने आयुक्तलयाने सर्वच मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित केले. त्याला आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची योग्य साथ मिळाली, त्यामुळे कोणत्याही अडचणी न येता उपक्रम यशस्वीपणे राबविणे शक्य झाले व मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालय सर्वाधिक गुणांची कमाई करत अव्वल क्रमांक पटकावू शकले, असे मिरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT