CP Vinay Kumar Choubey Sarkarnama
प्रशासन

Pimpri News : सीपी चौबेंचा दणका; खंडणी वसूल करणारे दोन पोलिस बडतर्फ, तर ड्रग प्रकरणातील पीएसआय निलंबित

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News : पुण्यातील ससून रुग्णालयातून गेल्या वर्षी ड्रग्जमाफिया ललित पाटील याने केलेल्या पलायनप्रकरणी तत्कालीन पुणे पोलिस आय़ुक्त रितेशकुमार यांनी ललितच्या बंदोबस्तावरील दोन पोलिसांना बडतर्फ केले होते. हा बडगा पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त (सीपी) विनयकुमार चौबे यांनीही गेल्या महिन्यात कॉलेज विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून पाच लाख रुपये उकळणाऱ्या देहूरोड पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवर उगारला आहे.

पोलिस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलिस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ अशी डिसमिस पोलिसांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खंडणी (Extortion) चा गुन्हा ते काम करीत असलेल्या देहूरोड पोलिस ठाण्यातच गेल्या महिन्यात 15 तारखेला दाखल आहे. त्यात अटक झाल्यानंतर दि. 18 फेब्रुवारीला सीपींनी त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर आता बडतर्फ केले.

या दोघांबरोबर त्यांचे साहेब आणि देहूरोडच्या डीबीचे (गुन्हे प्रकटीकरण पथक) प्रमुख पीएसआय सोहम धोत्रे यालाही सस्पेंड करण्यात आले आहे. एकाच दिवशी कारवाईचा तिहेरी दणका देताना पाच लाखांच्या लाचखोरीत नाव आलेले देहूरोड विभागाचे एसीपी (सहायक पोलिस आय़ुक्त) मुगुटलाल भानुदास पाटील यांची बदली सीपींनी कंट्रोलला केली, तर देहूरोड पोलिस ठाण्यावरील सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) वसंत विठ्ठल देवकाते यांनाही तिसऱ्या प्रकरणात घरी बसवले.

देहूरोड डीबीतील गायकवाड आणि शेजाळ यांनी आपल्या साथीदारांसह वैभवसिंग मनीषकुमारसिंग (वय 19, रा. बॉयज होस्टेल, सिंबायोसिस कॉलेज, किवळे; मूळचा झारखंड) या कॉलेज विद्यार्थ्याचे अपहरण केले. त्याला पोलिस ठाण्यावर नेले. गांज्याच्या खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवली. ते नको असेल, तर वीस लाख रुपयांची मागणी केली. त्यातील 4 लाख 98 हजार रुपये त्यांनी गूगल पे आणि नेट बॅंकिगद्वारे उकळले. आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवून देहूरोड डीबीचे प्रमुख पीएसआय धोत्रे यालाही सीपींनी निलंबित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगवी पोलिसांनी काल (ता. 1) नमामी शंकर झा (वय 32, सध्या रा. निगडी, मूळचा बिहार) या हॉटेल कामगाराकडून 2 कोटी 2 लाख रुपयांचे एमडी हा अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात शहर पोलिस दलातील निगडी पोलिस ठाण्यावरील विकास शेळके या पीएसआयला (फौजदार) आज अटक करण्यात आल्याने शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात देहूरोडमध्ये शहर पोलिसांची नाचक्की झाल्यानंतर त्यावर या महिन्यात कळस चढविणारी घटना घडली. 45 कोटी रुपयांच्या मेफेड्रोन तथा एमडी या अमली पदार्थाच्या (ड्रग) तस्करीत शहर पोलिस दलातील (निगडी पोलिस ठाणे) पीएसआय विकास शेळके नुकताच (ता. 2) पकडला गेला. त्याला 48 तास पोलिस कोठडी मिळाल्याने सीपींनी त्याला आता सस्पेंड केलं आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT