Sudhakar Badgujar, Suresh Jain, Dr.Pravin Gedam Sarkarnama
प्रशासन

Dr.Pravin Gedam: राजकीय नेत्यांना धडकी भरवणारे डॉ. प्रवीण गेडाम कोण आहेत ?

सरकारनामा ब्यूरो

Nashik News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. त्याला नाशिकमध्ये गंभीर वळण लागले आहे. योगायोगाने त्यात 11 वर्षांपूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्या कारकिर्दीला ग्रहण लावणारे सनदी अधिकारी डॉ.प्रवीण गेडाम कारणीभूत ठरतात की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. (ACB file a complain against Shivesa leader Sudhakar Badgujar in Nashik)

ठाकरे गटाचे (UBT Shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची मुंबई (Mumbai) बाॅम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासमवेत पार्टी केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यातच आता पोलिसांनी बडगुजर यांच्यावर नगरसेवकपदाचा (NMC) दुरुपयोग करून अपहार केल्याचा नवा गुन्हा दाखल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानिमित्ताने महाराष्ट्राच्या प्रशासकीय कारकिर्दीत जायंट किलर म्हणून नावलौकिक असलेले सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2002 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले गेडाम यांनी यापूर्वी जळगाव, अहमदनगर, नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे. पंतप्रधान कार्यालयात आरोग्य योजनांचे समन्वयक म्हणूनदेखील त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या ते राज्याचे कृषी आयुक्त असून, पुण्यात कार्यरत आहेत.

माजी मंत्री सुरेश जैन यांच्याविरोधात घरकुल घोटाळ्यात खटला दाखल करणारे अधिकारी म्हणून प्रवीम गेडाम परिचित आहेत. यासंदर्भात नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त राहिलेल्या गेडाम यांच्या पत्राच्या आधारे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख आणि माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात ‘एसीबी’ने 33.69 लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

बडगुजर अँड बडगुजर या कंपनीतून त्यांनी 2006 मध्ये निवृत्ती घेतल्याची खोटी कागदपत्रे तयार केली. 2007 ते 2009 या कालावधीत या कंपनीला महापालिकेकडून 33.69 लाख रुपयांचा आर्थिक लाभ मिळवून देत पदाचा गैरफायदा घेतला, असा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत काल रात्री पोलिसांनी त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली.

जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना गेडाम यांनी शिवसेनेचे नेते सुरेश जैन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांसह 49 जणांविरोधात 2006 मध्ये 29.59 कोटींच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. जळगाव शहरात 1999 मध्ये 141 कोटींच्या खर्चातून 11 हजार घरे बांधण्याचे काम सुरू झाले होते. त्यात जैन यांच्याच कंपनीला काम दिल्याचा आरोप होता. या प्रकरयमी 2012 मध्ये जैन यांना अटक झाली होती.

या खटल्यात जैन यांना 7 वर्षे तर देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा झाली होती. जैन साडेचार वर्षे तर देवकर तीन वर्षे कारागृहात होते. त्यांनी विधानसभेची निवडणूकदेखील कारागृहातूनच लढवली होती. सध्या ते जामिनावर आहेत. आता नव्याने नाशिकमध्ये दाखल झालेल्या बडगुजर यांच्या विरोधातील तक्रारीला राजकीय किनार असल्याने त्यात काय होते, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT