Narendra Dhabholkar sarkarnama
पुणे

Narendra Dhabholkar Case : दोन गोळ्या डोक्यात... एक छातीत... धडाधड पाच गोळ्या झाडल्या अन् दाभोलकर कोसळले

Akshay Sabale

Pune, 10 May : तारीख 20 ऑगस्ट 2013. अकरा वर्षांपूर्वी पुण्यात देशाला हादरवून टाकाणारी एक घटना घडली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीचे महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची याच दिवशी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या झाली होती. तब्बल 11 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयानं निकाल दिला आहे. पाचपैकी सचिन अंदुरे ( Sachin Andure ), शरद कळसकर ( Sharad Pawar Kalskar ) यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विरेंद्र तावडे ( Virendra Tawde ), संजीव पुनाळेकर ( Sanjiv Punalekar ), विक्रम भावे ( Vikram Bhave ) यांची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2013 मध्ये काय घडलं होतं?

20 ऑगस्ट 2013 ची सकाळ... नरेंद्र दाभोलकर ( Narendra Dabholkar ) घरातून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आल्यावर 7 वाजून 15 मिनिटांनी दबा धरून बसलेल्या दोघांनी दुचाकीवरून येत दाभोलकरांवर गोळीबार केला.

धाड... धाड... धाड अशा पाच गोळ्या झाडण्यात आल्या. यातील दोन गोळ्यांचा नेमका चुकला, तर दोन डोक्यात आणि एक छातीत जावून लागली. यात दाभोलकर जागीच कोसळले अन् त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

हत्येनंतर पूर्ण देशात खळबळ उडाली. सुरूवातीला पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्हीची पाहणी केली. पण, चित्र अस्पष्ट असल्यानं आरोपींना ओळखणं अवघड जात होते. एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं होतं की, दाभोलकरांना गोळीबार करणारे हल्लेखोर 7756 नंबरच्या दुचाकीवरून पळून गेले होते.

यानंतर पुणे पोलिसांनी नाशिक, ठाणे आणि पुण्यात असलेल्या तुरुंगातील तब्बल 200 आरोपी, कुख्यात गुंड यांच्यासह 1500 लोकांची चौकशी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 16 ठिकाणांहून पोलिसांनी 8 करोड फोन कॉलची माहिती मिळवली होती. प्रत्यक्षदर्शीनं सांगितल्यानुसार पोलिसांनी हल्लेखोरांनी वापरलेल्या काळ्या दुचाकीची एक यादी तयार केली होती. पण, पोलिसांनी कुठलेही धागेदोरे हाती लागत नव्हते.

2014 मध्ये पहिली अटक, पण...

पुणे पोलिसांनी या प्रकरणात 2014 मध्ये पहिली अटक केली, ती कथित बंदूक विक्रेता मनिष नागोर आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल याला. पण, यापूर्वी दोघांची अटक वादग्रस्त ठरलेली. 20 ऑगस्ट 2013 ला सायंकाळी चार वाजता ठाणे पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

दाभोलकरांच्या हत्येनंतर काही तासांमध्येच ही अटक झाली होती. 2013 मध्ये नागोरी आणि खंडेलवाल यांना महाराष्ट्र 'एटीएस'च्या ताब्यात देण्यात आलं. तेव्हा, त्यांच्याकडून 40 अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा 'एटीएस'नं केला होता.

यातील एका बंदुकीची मार्कींग ही दाभोलकरांच्या हत्या स्थळावरून जप्त केलेल्या काडतुसासोबत मिळत असल्याचं 'एटीएस'चं मत होतं. 'एटीएस'कडून ही माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली.

सुरूवातील 2012 च्या पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली ही अटक झाली होती. नंतर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र, 21 जानेवारी 2014 ला दोन्ही आरोपींनी न्यायालयात 'एटीएस' प्रमुखांवर आरोप केले होते. तत्कालीन 'एटीएस'प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी 25 लाख रूपयांची ऑफर दिली होती, असा दावा न्यायालयात दोघांनी केला.

नंतर सुनावणीत हे आरोप जाणीवपूर्वक केल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. पुणे पोलिसांनी दोघांविरोध आरोपपत्रही दाखल केलं नव्हतं. दोन्ही आरोपांचा दाभोलकर प्रकरणाशी संबंध नसल्याचं समोर आल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली.

पण, 2014 ते 2021 यादरम्यान बऱ्याच घटना घडल्या. काहींना अटक झाली काहींना सोडून देण्यात आलं. 15 सप्टेंबर 2021 ला दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे विशेष न्यायालयानं वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावर हत्या, गुन्ह्याचा कट रचणे आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत, युएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले होते.

संजीव पुनाळेकराविरोधात आयपीएसी कलम 201 अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला होता. पण, या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास न्यायालयात नकार दिला होता. पाचही आरोपींवर दोषारोप निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 2021 पासून खटल्याची सुरूवात झाली. यात तब्बल 20 साक्षीदार तपासण्यात आले होते.

न्यायालयानं काय म्हटलं?

शुक्रवारी ( 10 मे ) विशेष न्यायालयानचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी निकाल देत काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. "वीरेंद्रसिंह तावडे याचा हत्या प्रकरणात हेतू दिसून आला नाही. तावडेवर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. पण, विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलिस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. विक्रम भावे, संजीव पुनावळेकर यांच्याविरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे तीनही आरोपींची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे," असं न्यायालयानं म्हटलं.

"सचिन अंदुरे आणि शरद कळसकरनं गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्याआधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे," असं न्यायाधीशांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT