Chinchwad By-Election- AAP
Chinchwad By-Election- AAP  Sarkarnama
पुणे

Chinchwad : उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने 'आप'ने केला एक पदाधिकारी निलंबित; तर दुसऱ्यालाही दिली नोटीस

उत्तम कुटे

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार मनोहर पाटील यांचा अर्ज बाद झाल्याने या पक्षाला धक्का बसला होता. तो बाद होण्यामागे मोठे षडयंत्र आढळल्याने या पक्षाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला वर्षभरासाठी निलंबित केले. तर, दुसऱ्याला कारणे दाखवा नोटीस मंगळवारी (ता.१४) बजावली.

'आप'चे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांना एका वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले असून प्रदेश सचिव धनजंय शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी आणि प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी ही कारवाई मंगळवारी केली.

जाणीवपूर्वक हा प्रकार करण्यात आल्याचे त्यांनी या कारवाई आदेशात म्हटले आहे. शिंदे यांची जबाबदारी असताना उमेदवाराचा एबी फॉर्म कोरा गेलाच कसा अशी विचारणा करीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे. तर, दहा अनुमोदक उमेदवारी अर्जावर सह्या करण्यासाठी तयार असूनही हेतूपूर्वक त्यांच्या सह्या न घेता वेळ दवडीत नंतर घाईघाईने अर्ज दिल्याचा ठपका बेंद्रेवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, अर्ज बाद झाल्यावर त्याबाबत विचारणा करणाऱे पक्षाचे शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार यांना निवडणूक कार्यालयातच सर्वांसमोर बेंद्रेंनी मारहाण केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातून पिंपरी-चिंचवड 'आप'मधील गटबाजी समोर आली आहे.

उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्मही अपूर्ण असल्याने 'आप'च्या उमेदवारांचा अर्ज अवैध ८ तारखेला छाननीत बाद ठरल्याने या पक्षाला मोठा धक्का बसला होता. मात्र, तो जाणीवपूर्वक बाद करण्यात आल्याच्या तक्रारी खुद्द उमेदवारासह पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राठोड यांच्याकडे केल्याने हे षडयंत्र उघडकीस आले.

दरम्यान, वरकरणी दुसरे कारण देत उमेदवारी अर्ज वैध ठरूनही या पोटनिवडणुकीतून नंतर 'आप'ने माघार घेतली. म्हणजे चिंचवडमधील षडयंत्राचा फटका कसबापेठमध्ये उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या त्यांच्या उमेदवाराला नाहक बसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT