kalyan Politics : कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत; भाजप नेते अनुराग ठाकूरांचा दुसऱ्यांदा दौरा

Tour by Anurag Thakur : कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे भाजपने लक्ष केंद्रित केल्याने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Anurag Thakur and Shrikant Shinde
Anurag Thakur and Shrikant ShindeSarkarnama

डोंबिवली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघातील सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेत आहेत. तर या आधीही अनुराग ठाकूर हे तीन महिन्यांपूर्वी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शहरांचे दौरे करत त्या-त्या भागातील पक्ष संघटनाचा त्यांनी आढावा घेतला होता.

ठाकुर यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदार संघ चर्चेत आला आहे. भाजप या मतदार संघावर दावा करणार असल्याचे बोलले जात असतानाच मंत्री ठाकूर यांनी 'एकत्रित जोरदार लढू आणि चांगला विजय संपादीत करु' असे वक्तव्य या दौऱ्यात करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपाच्या गोटात वेगळीच खलबते शिजत असल्याचे बोलले जात आहे.

Anurag Thakur and Shrikant Shinde
Uddhav Thackeray News : मुंबईत मतांचं राजकारण; पंतप्रधान मोदींनंतर उद्धव ठाकरेही बोहरा धर्मगुरूंच्या भेटीला!

कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे यावा, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांची असून त्यासाठी वरिष्ठांकडे जोर लावला जात आहे. त्यामुळे येत्या काळात कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपाने दावा केला तर त्यात आश्चर्य वाटायला नको. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता ज्या मतदार संघांत भाजपचे खासदार नाहीत अशा सर्व ठिकाणी केंद्रीय स्तरावरुन वरिष्ठ नेते पाठवून पक्षाचे संघटन मजबूत करण्याची रचना भाजपाने आखली आहे. ठाकूर यांच्याकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून मंगळवारी ते दुसऱ्यांदा या मतदार संघाच्या दौऱ्यावर आले आहेत.

Anurag Thakur and Shrikant Shinde
Kalyan Politics : श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावर भाजप दावा करणार का?; अनुराग ठाकूरांनी स्पष्टच सांगितलं...

कळवा, मुंब्रा नंतर त्यांनी डोंबिवलीतील रोटरी भवन येथे आपला मुक्काम करत सहाही विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. भाजपच्या गटातील या हालचालींमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा करणार या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. ठाकूर यांच्या मागील दौऱ्यात खासदार शिंदे यांनी त्यांचे स्वागत करत या मतदार संघाचा मीच दावेदार असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर आता पुन्हा ठाकूर हे या मतदार संघात आले असून त्यांनी देखील एकत्रित लढू, जोरदार लढू आणि पहिल्यापेक्षा चांगला विजय मिळवू, असे सुतोवाच दिले आहेत. कोण इथून लढणार की इथला उमेदवार दुसरीकडून लढणार याची चिंता सोडून द्या, असे देखील ते बोलले असल्याने खासदार शिंदे हे ठाण्यातून आगामी निवडणूक लढणार? या प्रश्नाकडेही पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

Anurag Thakur and Shrikant Shinde
ShivSena : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; न्यायालयीन लढाईत शिंदे गटाला 'ही' एक चूक महागात पडणार?

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. या मतदारसंघाचा विचार करता रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्या काळापासून येथे जनसंघाचा पगडा राहीला आहे. 1960 - 70 च्या दशकापासून म्हणजेच नगरपालिका असल्यापासून येथे जनसंघाची रुजवात झाली आहे.

पांढरपेशी समाज या भागात जास्त असल्याने तो संघ व भाजपची फिक्स वोटर बॅंक तयार झाली. लोकसंख्या वाढत गेली तसा मतदार देखील वाढत गेला. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून भाजपचा बालेकिल्ला असून आमदार रविंद्र चव्हाण हा गड राखून आहेत.

कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड हे प्रथम अपक्ष लढले. त्यांना भाजपाने आपल्याकडे खेचून घेतले असून आता ते भाजपचे आमदार म्हणून विजयी झाले आहेत. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात आमदार कुमार आयलानी हे भाजपाचे आहेत. यामुळे कल्याण लोकसभेतील या तीनही विधानसभा मतदार संघात भाजपाची पकड मजबूत आहे.

Anurag Thakur and Shrikant Shinde
Kasba By Election : काँग्रेस उमेदवार धंगेकरांच्या फ्लेक्सवरून राष्ट्रवादी गायब? आघाडीत बिघाडी?

कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे प्राबल्य नाही. ठाकुर यांनी आपल्या दुसऱ्या दौऱ्याची सुरवातच मुंब्रा विधानसभा मतदार संघातून केल्याचे दिसून आले. या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच पक्षाचे काही नगरसेवक फोडल्याने आव्हाड हे शिंदे गटावर नाराज आहे. याठिकाणी लोकसभेला भाजपला मदत केल्यास विधानसभेला आव्हाड यांना मदतीचा छुपा हात पुढे करत शिंदे यांना आव्हान दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे.

त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे माजी खासदार आनंद परांजपे हे ही छुपा पाठिंबा भाजपला देऊ शकतात. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात मनसेचे आमदार राजू पाटील आहेत. सध्याच्या घडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांची जवळीक पहाता तसेच मनसेचे आमदार पाटील यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत भाजपा उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे मनसेचा पाठिंबा भाजपला जाऊ शकतो.

Anurag Thakur and Shrikant Shinde
Beed Politics : धनंजय मुंडेंच्या स्वागताला संसदेचा देखावा; पंकजांचे टेन्शन वाढले...

तर मुंब्रा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात माजी आमदार सुभाष भोईर यांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भोईर हे ही लोकसभेचे उमेदवार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून ग्रामीण परिसरात आहे.

त्यामुळे त्यांचा पाठिंबा कोणाला जातो हे पहावे लागेल. तसेच अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाचे बालाजी किणीकर हे आमदार असले तरी या भागात मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची एक कमांड आहे. या विधानसभा क्षेत्रांवर भाजपाने आपले लक्ष आता केंद्रीत केले असून केंद्रीय मंत्री देखील विशेष लक्ष देऊन आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) आणि भाजपा सरकार यांच्याकडून निवडणूका एकत्रित लढण्याचे सुतोवाच दिले जात असले तरी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपाकडे यावा अशी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहे. या मागणीचा वरिष्ठ विचार करतात की शिंदे गटाचे पारडे जड ठरते हे आता पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com