Pune News : येरवड्यातील दोन एकर जमीन हस्तांतरण प्रकरणाशी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांचा काहीही संबंध नव्हता. तो प्रस्ताव मुळातच गृहविभागाचा होता आणि पारदर्शी होता. जमिनीच्या मोबदल्यात घरे बांधण्याचा माझा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव चुकीचा नव्हता. शंभर टक्के बरोबर होता. ते झाले असते तर पोलिसांना चांगली घरे मिळाली असती. आजही ती जागा पडून आहे, असे माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी मीरा बोरवणकर यांच्या आरोपानंतर सांगितले. (Ajit pawar had nothing to do with land transfer in Yerwada: Dilip Band)
येरवड्यातील दोन एकर जागा विकसकाला हस्तांतरित करण्याबाबत तत्कालीन पालकमंत्र्यांनी मला सांगितले होते. मात्र, पोलिस दलाची जागा बिल्डरला देण्यास मी विरोध केला होता, असा आरोप पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केलेला आहे. त्यावर बंड बोलत होते.
माजी आयुक्त दिलीप बंड म्हणाले की, येरवड्यातील जागा बिल्डर हस्तांतर करण्याचा प्रस्ताव गृहविभागाचा होता. त्यावेळी आर. आर. पाटील हे गृहमंत्री, तर चंद्रा अय्यंगार मॅडम अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. त्या तीन एकर जागेपैकी एक एकर जागेवर पोलिस ठाणे बांधून देण्यात येईल आणि उर्वरित दोन एकर जागेच्या मोबदल्यात शिवाजीनगरला पोलिसांची घरे बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यावेळी आर. आर. पाटील, सत्यपाल सिंह आणि माझी एक बैठक झाली. त्यात आपल्याला काही फायदा होत नाही, त्यामुळे ही जागा हस्तांतरित कशी करणार, प्रोसिजर फाॅलो होत नाही. त्यापेक्षा आपण दोन एकर जागेच्या मोबदल्यात त्यांच्याकडून पोलिस वसाहत बांधून घेऊया. शिवाजीनगर पोलिस वसाहतीमधील पडलेली घरे आपण नव्याने बांधून घेऊयात. त्यासाठी आपल्याला टेंडर काढावे लागेल, असे मी सांगितले होते.
आम्ही ‘पीपीई’खाली एक प्रस्ताव तयार केला. एका संस्थेला कन्स्लटंट नेमलं. आर्किटेक्चर नेमले. माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्यावेळचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह, ॲडिशनल सीपी, चीफ इंजिनिअर, कलेक्टर, टाऊन प्लॅनिंगचे हेड, बीएमसीसीचे चीफ इंजिनीअर अशा सात लोकांची कमिटी होती. आम्ही रिपोर्ट तयार केला. त्यानंतर आम्ही निविदा काढल्या. सात निविदा आल्या होत्या. यामध्ये सगळ्यात जास्त रेट हा एव्हर्स स्माईल नावाच्या कंपनीने दिला होता, असेही बंड यांनी स्पष्ट केले.
आम्हाला वाटतं होतं की, साडेतीनशे घरे बांधून मिळतील. प्रत्यक्षात टेंडर ओपन झाल्यानंतर ४९५ पोलिसांची घरं, डेप्युटी कमिशनरची घरं आणि येरवड्याची अत्याधुनिक पोलिस ठाण्याची इमारत उभारण्याचा प्रस्ताव होता. गृहविभागाची जागा बिल्डर देण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मला गृहविभागाने नेमले होते. याची सर्व टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली होती. काम सुरू करताना सत्यपाल सिंह यांची बदली. कदाचित सिंह यांची एक महिनाभर बदली झाली नसती तर ते काम सुरू झालं असतं. गेल्या १५ वर्षांपासून ती जागा तशीच पडून आहे. पोलिस ठाणेही तसेच आहे, असेही माजी आयुक्तांनी नमूद केले.
ते म्हणाले की, कुठलाही बिल्डर फायदा असल्याशिवाय काम करतच नाही, पण त्यापेक्षा जास्त फायदा आपल्याला म्हणजे गृहविभागाला आहे. कारण गृहविभागाला ५०० घरे बांधून मिळणार होती. त्यासाठी आपल्याकडे निधी नव्हता. तीन एकर जागेपैकी एक जागेवर पोलिस स्टेशन बांधण्यात येईल. अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांचे फ्लॅट बांधून देईल, असे ठरले होते.
त्या जागेची त्यावेळी तीन कोटी किंमत होती, त्याबदल्यात आपल्याला १५ कोटींची घरे व बंगले बांधून मिळणार होते. तो चांगला प्रस्ताव होता. मला आजही वाटतं ते झालं असतं तर खूप चांगले झाले असते. पोलिसांची घरं झाली असती, शिवाय येरवाड्याचं पोलिस ठाणे आणखी रस्ताच्या बाजूला आलं असतं. पण मीरा बोरवणकर यांचा ही जागा विकसकाला देण्यास विरोध होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बंड यांनी सांगितले की, या प्रकरणाशी महसूलमंत्र्यांचा काहीही संबंध नव्हता. महसूलमध्ये माझ्याशिवाय कोणाचाही संबंध आलेला नव्हता. या जागेची वर्कऑर्डर देईपर्यंत पालकमंत्री अजित पवार यांचा कोणताही संबंध आलेला नव्हता. तोपर्यंत गृहमंत्री आणि त्यांचा विभागाच पिक्चरमध्ये होते. या बिल्डरचा जमीन हस्तांतराचा प्रस्ताव होता. मात्र, मी त्याला विरोध केला होता. जमिनीच्या मोबदल्यात घरे बांधण्याचा माझा प्रस्ताव हाेता. तो प्रस्ताव चुकीचा नव्हता. शंभर टक्के बरोबर होता. ते झाले असते, तर गृहविभागाचे भलेच झाले असते.
अजित पवार यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. पालकमंत्री म्हणून ते प्रत्येक गोष्टींचा आढावा घेतात. तो आढावा घेताना आम्ही त्यांना जागा अजून ताब्यात आलेली नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रोजेक्ट अजून सुरू झालेला नाही. म्हणून त्यांना बोलावा, असे म्हटल्यानंतर त्यांना निरोप दिला आणि त्यानंतर त्या अजित पवारांना भेटल्या, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.