supriya sule yugendra pawar ajit pawar sarkarnama
पुणे

Yugendra Pawar : सुप्रियाताईंना विन करण्यासाठी युगेंद्र पवार बारामतीच्या रणांगणात

Baramati Politcs : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता असतानाच युगेंद्र पवार सक्रिय झाले आहेत.

Akshay Sabale

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit pawar ) यांनी काका राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून फारकत घेत सत्तेत सहभागी झाले होते. अशातच आता अजित पवार यांच्या पुतण्यानं वेगळा निर्णय घेतला आहे. अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवारांबरोबर राहणार आहेत. युगेंद्र पवार यांनी आज ( 21 फेब्रुवारी ) बारामतीत शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली आहे. त्यामुळे युगेंद्र पवार लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

बारामतीत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला होता. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "कुटुंबात मला एकटे पाडले जात आहे. कुटुंब बरोबर नसेल, तरी जनता माझ्यासोबत आहे," असं विधान केलं होतं. अशातच आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी बारामतीतील शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली.

अजित पवार २ जुलैला काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हही अजित पवारांच्या गटाला मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळू शकते. त्या पार्श्वभूमीवर बारामतीत सुनेत्रा पवार यांचा प्रचारही सुरू आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, या नणंद भावजय यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज बुधवारी ( 21 फेब्रुवारी ) युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिल्यानं लोकसभा निवडणुकीत ते सुप्रिया सुळेंचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच, "मला सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यास आनंद होईल," अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवारांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना युगेंद्र पवार म्हणाले, "सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मी कार्यालयाला भेट दिली आहे. मी आठ वर्षे परदेशात होताे. चार वर्षांपूर्वी शरद पवारांनी माझी निवड विद्या प्रतिष्ठानवर केली आहे. मला सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यास आनंद होईल. मी शरद पवारांचा खूप आदर करतो. शरद पवारांनी सांगितलं तर लोकसभा निवडणुकीत दौरे करेन."

'कुटुंबात मला एकटे पाडले जात आहे,' या अजित पवारांच्या विधानाकडे पत्रकारांनी युगेंद्र पवारांचं लक्ष वेधलं. त्यावर युगेंद्र पवार म्हणाले, "माझं ते मत नाही. कुटुंबात फूट पडली असून, अजित पवारांना एकटं पाडलं आहे, असं मला वाटत नाही. कुटुंब एकच आहे. कुटुंब आणि राजकारण वेगवेगळं ठेवलं पाहिजे. मी फक्त कार्यालयाला भेट देण्यासाठी आलो असून, कुटुंबात खूप छोटा आहे."

शरद पवार काय म्हणाले?

युगेंद्र पवार यांनी अजित पवारांची साथ सोडत तुमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी कोल्हापुरात शरद पवारांना विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, "युगेंद्र पवार राजकारणात होते, हेच मला माहिती नव्हतं. युगेंद्र व्यावसायिक आहेत. युगेंद्र अमेरिकेत शिकून आले असून, राजकारणात नसतात."

युगेंद्र तुमच्याबरोबर आले तर स्वागत होईल का? या प्रश्नावर शरद पवारांनी म्हटलं, "कुणी एखादी भूमिका घेतली, तर त्याबद्दल वेगळं मत व्यक्त करण्याचं कारण नाही. कुठेही काम करण्याचा त्यांना अधिकार आहे."

कोण आहेत युगेंद्र पवार?

अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजीव आहेत. ते विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून, बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही काम पाहतात. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवार यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलं होतं. त्यामुळे युगेंद्र पवार हे पहिल्यापासून शरद पवार यांच्याबरोबर राहिल्याचं दिसून येते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT